एक महिन्यांपूर्वी नाटे बाजारपेठेतील मोबाईलचे दुकान फोडून सुमारे साडेसहा लाखांहून अधिक किंमतीचा माल चोरणाण्यात आला होता. याप्रकरणी ४ जणांना रत्नागिरी पोलिसांनी कर्नाटक आणि मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाखांचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासासाठी पोलिसांची पथके तयार करून कर्नाटक राज्यात तसेच मुंबई येथे पाठविण्यात आली होती. याबाबतची अधिक माहिती अशी क़ी, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळात घडलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने एक विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची यासाठी विशेष पथके तयार केली. त्याच दरम्याने २० ऑगस्ट २०२४ रोजी नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाटे-बाजारपेठ येथील झैद मोबाईल व इलेक्टॉनिक्स या दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने. उचकटवून दुकानात प्रवेश करून दुकानातून एकूण ४९ मोबाईल हॅण्डसेट, टॅब व अन्य साहित्य असा एकूण ६ लाख ८३ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
या दुकानाचे मालक नासिर इब्राहिम काझी (रा. जैतापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबत नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास चालू असताना, गोपनीय माहितीच्या आधारे तसेच नाटे परिसरातील कंत्राटी बांधकाम करणाऱ्या काही इसमांकडे केलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी हे कर्नाटक राज्यात व मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे यांनी लागलीच दोन पथके तयार करून कर्नाटक राज्य व मुंबई या ठिकाणी तपासासाठी पाठविली.
या पथकांकडून कर्नाटक राज्य व मुंबई येथे तपास चालू असताना, कर्नाटक राज्यात एका तपास पथकाने करण हाज्याप्पा पुजारी (२६, रा. बाजनगर, सुबानाईक तांडा, नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक), राहुल रेड्डी चव्हाण (२४, रा. बलराम चौक, तलाई तांडा, जि. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांचा गुलबर्गा, कर्नाटक येथे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे मुंबई येथे गेलेल्या तपास पथकाने प्रेम सपन कर्माकर (२२, रा. मोतीला नगर, नंबर १ रोड, गोरेगाव वेस्ट, दत्त मंदीराजवळ, रुम नं. ५०४, मुंबई) याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.
तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे सबन्ना भिमराय कोबळा (२४, रा. नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांना नाटे पोलीस ठाणे हद्दीमधून ताब्यात घेतले. या चारही जणांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण ४ लाख १३हजार १७७ रुपये किंमतीचे ३३ मोबाईल हॅन्डसेट, १ टॅब असे साहित्यं जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलीस हवालदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार शांताराम झोरे, पोलीस हवालदार नितीन ढोमणे, पोलीस हवालदार बाळू पालकर, पोलीस हवालदार विक्रम पाटील, पोलीस हवालदार अमित कदम, पोलीस हवालदार प्रवीण खांबे, पोलीस हवालदार गणेश सावंत, पोलीस हवालदार रमिज शेख, चालक .पो.शि अतुल कांबळे तसेच नाटे. पोलीस ठाणे मधील पोलीस हवालदार राकेश बागुल व पो.शि. श्री. चव्हाण यांनी केली. या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी पथकाचे अभिनंदन केले.