शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षीय व सत्तेचे महानाट्य घडले. याचा फटका शिवसेनेला महाराष्ट्रात बसला. गेले वर्षभर रत्नागिरीतही धुसफूस सुरू होती. मंत्र्यांसोबत शिंदे गटात राष्ट्रवादीतील कार्यकर्ते गेले, शिवसेना खंबीर आहे, असे सांगत आता शिवसेना आता पुन्हा राखेतून उभारी घेत आहे. याची झलक रविवारी (ता. 6) शहराच्या मेळाव्यात पाहायला मिळाली. शिवसेनेत तोच जोश आणि जल्लोष पाहायला मिळाला. भाजप-शिवसेना युती सरकार असतानाच रत्नागिरी शहराचा विकास सुरू झाल्याचे सांगत पुन्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच नगराध्यक्ष, आमदार, खासदार निवडून येईल, अशी शपथ या वेळी घेण्यात आली.
पुढील महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी या वेळी जाहीर केले. लांजा- राजापूरचे आमदार राजन साळवीच असतील, असे राऊत यांनी सांगताना रत्नागिरीमध्ये उदय बने यांच्या नावाचे सूतोवाच केले. बने यांची विधानसभा क्षेत्रात एक फेरी झाली असून दुसरी लवकरच सुरू होईल, असे सांगितले. जिल्हा परिषद गटामध्ये बने यांनी त्यांचा पराभव केला आहे, आता विधानसभा समोर आहे, असे सांगितले. राजन साळवी यांचा पत्ता कट करणार, प्रमोद शेरे- बंड्या साळवी माझ्यासोबत येणार, अशा वल्गना करणाऱ्या मंत्र्यांना राऊत यांनी चपराक दिली. शिंदे गटाच्या मेळाव्यात इकडून तिकडून माणसं आणायला लागतात. त्यांच्या जिल्हाप्रमुखाला वाड्यांची तिथल्या गावकरांची तरी माहिती आहे का?. एका अर्थाने ते बरेच आहे.
आपल्यालाच फायदा मिळणार आहे, असा टोला बंड्या साळवी यांनी राहुल पंडित यांचे नाव न घेता हाणला. या कार्यक्रमात राजीवडा, कोकणनगर, मिरकरवाडा येथील शेकडो मुस्लिमांनी प्रवेश झाला.या वेळी सहसंपर्कप्रमुख राजू महाडिक यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली. आजच्या पक्षप्रवेशानंतर आम्हाला रोखायचे कसे, यासाठी प्रयत्न सुरू करतील. नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी अनेकांना उमेदवारीसाठी वणवण करावी लागली. उंबरठे झिजवावे लागले; परंतु आता कोणालाही दारात जावे लागणार नाही. निष्ठावंतांना उमेदवारी मिळणार आहे. एकदा लोकप्रतिनिधी निवडून आला की, तो सर्वांचा असतो. त्यामुळे पालकमंत्र्यांनी विकासकामे दिली म्हणजे उपकार केले नाहीत. ती त्यांची जबाबदारीच आहे. ते शिवसैनिक नसते, तर मंत्री काय आमदारसुद्धा झाले नसतात.