गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि पेडणेकर हे बोलत होते. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्पाला अंतिम मानांकनासाठी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील वाळूशिल्प प्रदर्शन हा एक उपक्रम आहे. मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, प्रकल्प सहाय्यक दीपक विचारे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. वाळूशिल्प प्रदर्शनात अष्टवणे श्री गणेश मंदिराची प्रतिकृती साकारली आहे तर भगवान महादेव यांची प्रतिकृती, गुहागरचे डॉल्फिन प्रदर्शन, कोकण संस्कृती आधी वाळूशिल्प कलाकृती पहावयास मिळत आहेत. या वेळी गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे भेळपुरी सेंटर, जेवण व विविध कोकणी पदार्थ विक्री करणारे छोट्या व्यावसायिकांना डस्टबिन वितरित करण्यात आले.
या शिल्प प्रदर्शनाला तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, अॅड. संकेत साळवी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. ब्लू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळे या पर्यटनातून सर्वांचा विकास होईल. दर पंधरा दिवसांनी येथील समुद्राच्या पाण्याची तसेच हवेचे प्रदूषण नियंत्रक मंडळाच्यावतीने तपासणी केली जात आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा द्यावयाच्या आहेत. त्यासाठी ही एक संधी निर्माण झाली आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. यामुळे आपण सर्वांनी मिळून एकत्र यावे, असे आवाहन विचारे यांनी केले आहे.
प्लास्टिक टाकण्यास मनाई – गुहागर समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक अथवा कचरा टाकू नये, यावर कडक निर्बंध यापुढे लावले जाणार आहेत. प्लास्टिक पिशवी किंवा अन्य प्लास्टिक टाकणाऱ्यांना दंड केला जाणार आहे. आपण व्यावसायिकांनी स्वतः स्वच्छतेबरोबर येणाऱ्या सर्व पर्यटकांना व स्थानिक जनतेलाही कचरा उघड्यावर टाकू नये, अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिली.

