चिपळूण नगर पालिकेच्या सुमारे वीस लाख खर्च करून करण्यात येणार्या जुन्या धोकादायक इमारतीच्या रंगरंगोटी कामाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे.
चिपळूणमध्ये पालिकेच्या दोन इमारती आहेत. यातील एक इमारत पन्नास वर्ष जुनी तर दुसऱ्या इमारतीचे बांधकाम १९९७ मध्ये करण्यात आले आहे. दोन्ही इमारती आता जून्या झाल्या असल्याने तेथे काम करणे अतिशय धोकादायक बनले आहे. पालिकेत काम करणारे कर्मचारी व अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही पालिका इमारतीमध्ये वावरताना भिती वाटत आहे. मध्यंतरी इमारतीचा काही भाग ढासळला होता. त्यामुळे भविष्यात कधीही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत श्री. मुकादम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चिपळूण नगर परिषदेच्या इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कार्यालयाकडे माहिती घेतली असता सुमारे २० लाख रुपये अंदाजपत्रकीय खर्चाचे निविदेस मान्यता देण्यात आली असून त्यानुसार हे काम सुरू आहे. वास्तविक न.पा.ची इमारत धोकादायक झाली असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून यापूर्वीच आदेश प्राप्त झालेले आहे. तथापि अद्यापही स्ट्रक्चरल ऑडीट केलेले नाही, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
परंतु, सत्यतेमध्ये या दोन्ही इमारतीचे करण्यात आलेल्या स्ट्रक्टरल ऑडिटमध्ये त्या धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही पालिकेचा कारभार इतर ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे असताना देखील अजून पर्यंत जुन्या इमारतींची तात्पुरती डागडुजी करून प्रशासनाचा कामकाज तिथेच सुरू आहे.