शहरातील बहुतांशी नागरिक घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये जातात. तेथील सर्व्हरची गती कमी असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. पालिकेच्या उत्पन्नाच्या महत्वाच्या स्रोतांमध्ये घरफाळा व पाणीपट्टी यांचा समावेश आहे. बहुतांश सर्व नागरिकांना घरफाळा भरावा लागतो. तसेच पाणीपट्टीही भरावी लागते. घरफाळा वर्षातून एकदा भरायचा असला तरी पालिकेत ही वर्षभर सुविधा चालू असते. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांवर रांग लागलेली पाहायला मिळते. त्यासाठी वेळ जातो. पाणीबिल भरण्यासाठीही दर महिन्याला भरणा केंद्र गाठावे लागते. त्यासाठीही रांगेत उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी पालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जे लोक घरातून पाणीबिल आणि घरफळा भरतात त्यांना पालिका कराच्या रकमेत सूट देते. घरातून ऑनलाईन घरपट्टी आणि पट्टी भरल्यानंतर अनुदानाची रक्कम नागरिकांना मिळत नाही. नागरिकांनी पालिकेत विचारणा केल्यावर तो यंत्रणेचा दोष असल्याचे कारण दिले जाते. त्यामुळे बहुतांशी नागरिक ऑनलाईन घरपट्टी न भरता पालिकेत येऊनच घरपट्टी भरतात. पालिकेत घरपट्टी भरून घेण्यासाठी एकच लिपिक आहेत. त्यातच सर्व्हरची गती मंद असल्यामुळे वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी भरून घेतली जात नाही. नागरिकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागते.