रासायनिक खताचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा. रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीचे माती परीक्षण करून घेऊन शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूळ घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा, तसेच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे. सरकारने नॅनो खाते –नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे ५०० मिली पॅकिंगमध्ये असून, नॅनो युरियामध्ये ४ टक्के नत्राचे प्रमाण तसेच नॅनो डीएपीमध्ये ८ टक्के नत्र व १६ टक्के स्फुरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते. नॅनो युरिया व डीएपीद्वारे पिकांना नत्र व स्फुरद फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फूरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. त्यामुळे नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये विहित वेळेत योग्य त्या प्रमाणात पिकांना (८६ टक्के) उपलब्ध होतात.
या नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमीन हवा व पाणी या मूलभूत घटकांना प्रदूषणमुक्त ठेवता येते. लागवडीच्या खर्चात बचत होते व पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते. नॅनो खतांच्या उत्तम परिणामासाठी पहिली फवारणी पिकाच्या फुटवे किंवा फांद्या फुटण्याच्या अवस्थेत व दुसरी फवारणी पिकाच्या फुलोरा किंवा शेंगा लागण्याच्या ७ ते १० दिवस अगोदर करावी. फवारणी सकाळच्या वेळेत कमी उन्हात आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी. नॅनो खते समप्रमाणात सर्वत्र मिसळण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी. नॅनो युरिया किंवा डीएपी फवारणीद्वारे देण्यात यावे.