26.8 C
Ratnagiri
Saturday, July 26, 2025

राज्यात म्हणे ८ मंत्र्यांना नारळ देणार! कोकणातील ४ पैकी कोण जाणार?

ज्या ८ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे, त्यामध्ये...

राजापूरमध्ये एसटी बस, दुधाच्या टँकरमध्ये अपघात

ओणी पाचल मार्गावर पाचलकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली-रत्नागिरी...

हमीभाव दूरच आंबा-काजूला खात्रीचं मार्केटही नाही

बळीराजाच्या जीवनात संपन्नता न येण्याची अनेक कारणं...
HomeKhedपावसामुळे परशुराम घाटातील धोक्यात वाढ...

पावसामुळे परशुराम घाटातील धोक्यात वाढ…

गॅबियन वॉलचा भराव वाहून जात असल्याने तेथे प्लास्टिकचे आच्छादन केले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोका आणखी वाढला आहे. तात्पुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पूर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्याशिवाय गॅबियन वॉलचा भराव वाहून जात असल्याने तेथे प्लास्टिकचे आच्छादन केले आहे; परंतु वाढत्या पावसामुळे दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण झाला असून, पावसाचा जोर कमी होताच दुरुस्तीला चालना मिळणार आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरण या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुरुवातीला कुळ, खोत व देवस्थानच्या मोबदल्यावरून परशुराम नेहमी चर्चेत राहिला. त्यानंतर परशुराम घाटाच्या डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेल्या वस्तीचा सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला; परंतु आता हे सर्व बाजूला राहिले असून, परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते, तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता.

त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची संरक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारली जात होती, तसेच पायथ्यालगत डबर व सिमेंटच्या आधारे मजबुतीकरण केले जात होते. हे काम सुरू असताना मे महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसात नव्याने उभारलेली गॅबियन वॉल खचली. त्यानंतर काही दिवसांतच या वॉलचा काही भाग भरावासह वाहून गेल्याने या मार्गावरील धोका आणखी वाढला. परशुराम घाटात आतापर्यंत अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर अधूनमधून भराव वाहून जाणे, संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणाला तडे जाणे, दरडीची माती घसरणे, रस्त्यावर दगड येण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यासाठी डोंगरावर लोखंडी जाळी बसवण्याचे काम भरपावसातही सुरूच आहे; परंतु या घाटातील दरडीकडील मार्ग अतिशय धोकादायक बनल्याने या ठिकाणी बॅरिकेडस् उभारून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे काही वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत जास्त भर पडत आहे. अतिवृष्टीच्या वेळी अवजड वाहतूक सकाळ व संध्याकाळच्या सत्रात बंद ठेवावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular