पाकिस्तानात खेळण्यासाठी केंद्र सरकारकडून भारताच्या टीम इंडियाला अद्याप परवानगी देण्यात आली नसली, तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून चॅम्पियन्स करंडकाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यांमधील सामना १ मार्च २०२५ रोजी लाहोर येथे होणार आहे; मात्र पाकिस्तानकडून तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकाला बीसीसीआयकडून अद्याप संमती देण्यात आलेली नाही, अशी माहिती आयसीसीच्या सदस्याकडून बुधवारी देण्यात आली. आयसीसीच्या सदस्याकडून पुढे सांगण्यात आले की, पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून चॅम्पियन्स करंडकातील १५ सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सात सामने लाहोरमध्ये, तीन सामने कराचीमध्ये आणि पाच सामने रावळपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना कराचीत खेळवण्याचा प्रस्ताव आहे. कराची व रावळपिंडी येथे उपांत्य सामने होतील. लाहोरमध्ये जेतेपदाची लढत रंगेल. तसेच भारतीय संघाच्या सर्व लढती सुरक्षेच्या कारणास्तव लाहोरमध्ये पार पडणार आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास तीही लढत लाहोरमध्ये पार पडेल.