शहराजवळील मिरजोळे- एमआयडीसी येथे गोवंश हत्या प्रकरणी परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकाराची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. जमावाने दोषींवर कठोर कारवाईचा मागणी केल्याने पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काल (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. एका टेम्पोतून गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडल्यानंतर हा विषय चिघळला आहे. संतप्त झालेला जमाव रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात ठाण मांडून होता. पोलिसांकडूनही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
अखेर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर जमावाने शांततेची भूमिका घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी येथे हा प्रकार घडल्यनंतर स्थानिकांनी घटनेची वास्तवता जाणून घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. गोवंश हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांडून करण्यात आली तसेच घटनास्थळी असलेल्या जमावाने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याकडे आपला मोर्चा वळविला.
ते पोलिस ठाण्यात जमा झाले.. या वेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाले. उपस्थित जमावाला शांतता राखण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले. ग्रामीण पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महामुने करत आहे.