26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeSportsभारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

भारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

न्यूझीलंड २३५ त्यानंतर भारताची १ बाद ७८ वरून ४ बाद ८६ घसरगुंडी.

बंगळूर आणि पुणे कसोटीत भारतीय संघाच्या पराभवात ढासळलेली फलंदाजी भारताच्या पराभवात निर्णायक ठरली होती. मुंबईतील तिसऱ्या सामन्यातही ती नामुष्की टाळण्याची संधी मिळाली, परंतु एक बाद ७८ अशी भक्कम सुरुवात केल्यानंतर भारताची दिवसअखेर चार बाद ८६ अशी घसरगुंडी उडाली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी वेगळे संकेत देत आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात १४ फलंदाज बाद झाले. मुळात पुण्यात न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरच्या फिरकीसमोर भारतीयांनी नांगी टाकली होती. तो सँटनर या सामन्यात खेळत नाहीये, हा एक दिलासा होता तरीही दिवसअखेर १० चेंडूत सात धावांत तीन फलंदाज गमावले आणि हाती आलेली पकड स्वतःहून ढिली केली. नाणेफेक जिंकली असती, तर आपणही आज प्रथम फलंदाजी स्वीकारली असती, असे भारतीय कर्णधार रोहित शर्मा सकाळी म्हणाला, परंतु पाच विकेट मिळवणारा रवींद्र जडेजा आणि चार विकेटचे योगदान देणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर यांच्यामुळे रोहितला ६५ षटकांचा खेळ झाल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, प्रत्यक्षात मात्र त्याचे अपयश कायम राहिले आणि तो केवळ १८ धावांवर बाद झाला.

रोहित शर्माला १५ धावांवर असताना जीवदान मिळाले होते. हेन्रीच्या उसळत्या चेंडूवर रोहितने हुकचा फटका मारला, परंतु सीमारेषेवर ओ रुकने हातात आलेला झेल सोडला. या जीवदानानंतरही रोहित सावरला नाही. पुढच्या षटकात हेत्रीचा चेंडू लेगसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू काहीसा थांबून आला आणि तो बॅटच्या कडेला लागून स्पीमध्ये गेले. न्यूझीलंड कर्णधार लॅथमने तो सहज झेलला रोहित बाद झाल्यावर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी ५३ धावांची भागीदारी केली तेव्हा सर्व काही सुस्थितीत असल्याचे जाणवत होते, परंतु त्याच वेळी जयस्वालला रिव्हिर्स स्वीप मारण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्याने विकेट गमवली. नाईट वॉचमन म्हणून आलेला मोहम्मद सिराज पहिल्याच चेंडूवर बाद झाला, मात्र त्यानंतर गरज नसताना चोरटी धाव घेताना विराट कोहली धावचीत झाला आणि अखेरच्या १० मिनिटांत भारताने पकड गमावली. या पडझडीनंतर खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल ३१ तर रिषभ पंत एका धावेवर नाबाद राहिले. फिरकीस साथ देणारी खेळपट्टी पहाता भारताला न्यूझीलंडची धावसंख्या पार करण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे.

खेळपट्टी साथ देणारी असली तरी तिचा फायदा घेता आला पाहिजे. आजच्या पहिल्या दिवसात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर एका बाजूला, तर अनुभवी आर अश्विन एका बाजूला, असे चित्र होते तरीही भारताने न्यूझीलंडचा डाव २३५ धावांत गुंडाळला. निष्प्रभ ठरलेल्या अश्विनने १४ षटकांत ४७ धावा दिल्या. त्याच वेळेस एका क्षणी वॉशिंग्टनने सलग तीन, तर जडेजाने सलग पाच विकेट मिळवण्याची कामगिरी केली. जसप्रीत बुमराला विश्रांती दिली जाणार ही शक्यता खरी ठरली आणि त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली, परंतु एका बाजूने आकाश दीप भेदक मारा करत असताना सिराज मात्र प्रभावहीन होता. याचा आकाश दीपने चाचपडत असलेल्या डेव्हन कॉनवे याला पायचीत केले.

भारतासाठी सुरुवात तर चांगली झाली होती, पण न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग यांनी ४४ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीस आला आणि त्याने लॅथम आणि फॉर्मात असलेल्या राचिन रवींद्र यांना हलकेच वळलेल्या चेंडूवर त्रिफाळचीत केले. या दोन विकेट भारतीयांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या होत्या. उपाहारापर्यंत न्यूझीलंडने तीन विकेट गमावल्या होत्या. उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात विल यंग आणि डॅरैल मिचेल अशा प्रकारे फलंदाजी करत होते की त्यांनी भारतीय फिरकीवर नियंत्रण मिळवले, असे जाणवत होते. एव्हाना अश्विनची जागा जडेजाने घेतली होती. जडेजाने बरोबर मधल्या यष्टीवर टप्पा ठेवला आणि बघता बघता तो घातक ठरू लागला. प्रथम त्याने ७१ धावा करणाऱ्या यंगला अडसर दूर केला. स्लिपमध्ये रोहितने अप्रतिम झेल पकडला.

रवींद्र जडेजाने याच षटकात टॉम ब्लंडेल याच्या यष्टीचा वेध घेतला आणि न्यूझीलंडचा निम्मा संघ १५९ धावांत परतला होता. त्यानंतर जडेजाने असाच चेंडू ग्लेन फिलिप्सलाही टाकला, तोही त्रिफाळचीत झाला. एव्हाना वॉशिंग्टन सुंदरनंतर जडेजाने न्यूझीलंड फलंदाजीच्या नाड्या आवळल्या होत्या, पण डरैल मिचेल एक बाजू लढवत होता. उन्हाचा त्रास सहन करतानाही त्याने जिद्द सोडली नव्हती. त्याने तीन चौकार आणि तीन षटकारांसह ८२ धावांपर्यंत मजल मारली तोपर्यंत न्यूझीलंडने दोनशे धावांचा टप्पा पार केला होता. वॉशिंग्टनने त्याला बाद करताना रोहितने स्लिपमध्ये आणखी एक अप्रतिम झेल टिपला.

RELATED ARTICLES

Most Popular