राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता, कौशल्य विकास विभागातर्फे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या पंडीत दिनदयाळ रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले कि, स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहीन आणि यासाठी जिल्ह्याच्या वातावरणाला पूरक अशा नवीन उद्योगांसाठीही पुढाकार घेण्याचे आवाहन यांनी आज येथे केले.
या कार्यक्रमास नवोदित जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त ईनुजा शेख, जिल्हा सहा. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कोतवडेकर, रत्नागिरी आय.टी. आय. चे प्राचार्य शेटये, लांजाचे गवळी आदिंची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
व्यवसाय व उद्योग वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम शासन करीतच आहे तथापि या उद्योगांनी स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही असे सांगून सामंत म्हणाले की, उद्योग उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची भूमिका मी स्थानिक पालकमंत्री या नात्याने घेतली आहे.
आयटीआय मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा मुलत: ग्रामीण भागातून येणारा असतो. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती बेताचीच असते. अशा सर्वांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी संपूर्ण राज्यासाठीचे सर्वंकष धोरण ठरविण्यात येईल असेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले. उद्योगांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे हे त्यांनी सांगावे त्या स्वरुपाचे शिक्षण व प्रशिक्षण येथे उपलब्ध करुन रोजगारात स्थानिकांचा वाटा वाढावा यासाठी आपण प्रयत्न करु असे ते म्हणाले.

