गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुरादपूर पेठमाप पुलाचे काम जोडरस्त्यासाठी थांबले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्चातून जोडरस्ता उभारला जाणार आहे. या कामासाठी नऊ निविदा आल्या होत्या. या प्रक्रियेत अपात्र निविदा पात्र ठरवत प्रशासनाने बेकायदेशीर व नियमबाह्य कारभार केल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत मुकादम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पेठमाप मुरादपूर पुलाच्या जोडरस्त्याचे काम ५.६१ कोटींचे आहे. या कामासाठी १६ जुलै २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार एकूण ९ निविदा प्राप्त झाल्या होत्या. सुरुवातीला तांत्रिक पडताळणीत बहुतांश निविदा अपात्र ठरत होत्या; मात्र त्यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी आणि निविदा समितीने सर्वच निविदा पात्र ठरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शासनाच्या निविदा मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप मुकादम यांनी केला आहे.
निविदेतील स्टॅम्प काँक्रिट कामाचा अनुभवाचा दाखला, स्वतःच्या मालकीच्या मशिनरीची अट असतानाही त्या परस्पर शिथिल केल्या. मुळात निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील अटीशर्ती बदलणे किंवा रद्द करणे, हा अधिकार मुख्याधिकारी अथवा निविदा समितीला नाही. तरीही मनमानी पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न राखता काही निवडक ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी अटी बदलण्यात आल्या. त्यामुळे ही प्रक्रिया संशयास्पद असून, गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे, असा आरोप मुकादम यांनी केला आहे. या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या निविदेची फेरनिविदा परिपूर्ण अटीशर्तीसह प्रसिद्ध करण्यात यावी. तोवर या कामाच्या अंमलबजावणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

