जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या साडेतीनशेपैकी १५० शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यात महिला आणि संवर्ग १ म्हणजेच दिव्यांग, आजारी, माजी सैनिक, विधवा अशा शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वाढणार आहे तसेच काही मोठ्या पटांच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. जिल्ह्यात शिक्षकांची सुमारे २ हजारपेक्षा जास्त पदे रिक्त होती. मे महिन्यापासून आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने त्यांची रिक्त पदांमध्ये भर पडली. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी शिक्षकभरती प्रक्रिया सुरू आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये १ हजार ३४ शिक्षकांची पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ९९७ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, ३६७ पैकी ३४० पदे भरण्यात आली आहेत. या प्रक्रियेत एकूण १ हजार ४३७ शिक्षकांची पदे भरण्यात आली. शिक्षक भरतीनंतरही सुमारे ७५० शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यातच १५० शिक्षक कार्यमुक्त करण्यात आल्याने शिक्षकांची सुमारे ९०० पदे रिक्त झाली आहेत. जिल्हा परिषदेने १५० शिक्षकांना कार्यमुक्त केले. त्यामध्ये संवर्ग-१ मधील ४८ आणि महिला १०२ शिक्षकांचा समावेश आहे.
संवर्ग-१ मध्ये गंभीर आजार, दिव्यांग, विधवा, कुमारिका, आजी माजी सैनिकांच्या पत्नी, ५३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षिका आहेत. त्याचबरोबर हे शिक्षक कार्यमुक्त केल्यानंतर आणखी २०० शिक्षक स्वगृही जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना कधी सोडणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्नच आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची १० टक्के पदे रिक्त आहेत. आरटीईच्या कायद्याप्रमाणे १० टक्के पदे रिक्त असल्यास आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असा शासननिर्णय आहे. त्यामुळे आणखी १५० शिक्षक कार्यमुक्त केल्याने रिक्त पदांचा आलेख वाढून तो १२ टक्क्यांपर्यंत जात आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून आरटीई कायदा धाब्यावर बसून त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त असतानाही मे, २०२३ मध्ये ७०७ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. त्या वेळी शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये भर पडल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांना कार्यमुक्त केले होते. त्यामुळे जिल्हा परजिल्ह्यातील शिक्षकांसाठी कार्यशाळा बनली आहे का, असा सवाल पालकांकडून होत आहे.