चंद्रावर वाहन उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला असून दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.
१४ जुलैला भरारी – १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ कक्षावरून हे चांद्रयान- ३ आकाशात झेपावलं होतं. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँड होणार होतं. हे लँडिंग यशस्वी झाले. दिवसभर देशवासियांसह जगभरातील नागरिकांचे डोळे चांद्रयानाच्या लँडिंगकडे लागले होते. लँडिंग यशस्वी होताच सर्वांनी आनंद तर व्यक्त केलाच जोडीलाच शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षावदेखील केला.
देशभर पूजा-अर्चा, होमहवन – चांद्रयानाच्या लँडिंगचे वेध मंगळवारपासूनच साऱ्या देशवासियांना लागले होते. देशभरात विविध देवालयांम ध्ये भाविकांनी पूजा-अर्चा, होमहवन, प्रार्थना, महाआरती, अभिषेक करून ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देवाला साकडे घातले होते. देशवासियांच्या या प्रार्थनेचे बळ आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी घेतलेली मेहनत सायंकाळी यशस्वी झाल्याचे कळताच साऱ्या देशात जल्लोष सुरू झाला असून रात्री उशीरापर्यंत तो सुरू होता. अनेकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत आनंद साजरा केला. मिठाई वाटली.
शेवटची १५ मिनिटे धाकधूक – मंगळवारपासूनच चांद्रयानाच्या लँडिंगचे काऊंटडाऊन सुरू झाले होते. देशभरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बंगळूरू येथील इस्रोच्या नियंत्रण कक्षातून यानाची आणि विक्रम लँडरच्या अगदी सूक्ष्म हालचालीवरदेखील बारकाईने लक्ष ठेवले जात होते. शेवटची १५ मिनिटे महत्वाची असतील असे शास्त्रज्ञांनी म्हटले होते. कारण चांद्रयान- २ मोहीम या शेवटच्या १५ मिनिटाच्या कालावधीतच अपयशी ठरली होती. त्यामुळे यावेळी काही चूक राहू नये याची पूरेपूर खबरदारी घेतली जात होती.
प्लॅन बी होता तयार – शेवटच्या क्षणी जर वातावरण खराब झाले तर इस्त्रोने त्यांचा प्लॅन बी तयार ठेवला होता. शेवटच्या १५ मिनिटात जर का वातावरणामुळे यान उतरण्यास अडथळा येईल असे दिसले असते तर शास्त्रज्ञांनी बुधवारऐवजी रविवारी २७ ऑगस्टला लँडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचा निर्णय नियोजित वेळेच्या आधी २ तास घेण्यात येईल, असे इस्त्रोने जाहीर केले होते. मात्र सारे काही सुरळीत असल्याचे चित्र बुधवारी सकाळपासूनच दिसत होते. त्यामुळे वैज्ञानिकांची आजच सुखरूप लँडिंग होणार याबाबतची खात्री पटली होती. तरीही थोडेफार चिंतेचे वातावरण होते. मात्र या चिंतेवर मात करण्यात यश मिळाले.
५ वाजून ४४ मिनिटे दिवसभर – अतिशय बारकाईने यानाचे निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दुपारी स्थितीचा आढावा घेतला आणि त्याचवेळी सर्व परिस्थिती सामान्य असल्याचे जाहीर केले. बंगळूरू येथील नियंत्रण कक्षात मिशन चांद्रयान ऑपरेशन टीमची तयारी पूर्ण झाली होती. सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी लँडर योग्य स्थितीत येताच उत्साहाचे वातावरण तयार झाले. त्याचा वेग कमी करण्यात आला. टीम ऑटोमॅटिक लॅडिंग सिक्वेन्स लाँच करण्यात आली. वातावरण अनुकूल असल्याचे इस्त्रोने ट्रिटद्वारे जाहीर करताच देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आता लँडिंग सुखरूप होणार, याची खात्री पटली होती.
‘त्या’ क्षणाची उत्सुकता – आता उत्सुकता होती ती नेमके विक्रम लँडर चंद्रावर उतरणार त्या क्षणाची. ठिक ६ वाजून ४ मिनिटांनी तो क्षण आला. यान चंद्रावर उतरले. त्यानंतर साऱ्यांनी टाळ्या वाजवत आनंद प्रकट केला. शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीचं सोनं झाल्याची प्रतिक्रिया देशभरात व्यक्त होत आहे.
पहिल्या दिवसापासून यश – १४ जुलै रोजी चांद्रयान- ३ श्रीहरीकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून हे यान अवकाशात झेपावले होते. १४ जुलैपासून आज २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भारताला यश मिळालं. यानाच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा यशस्वी ठरला आहे. भारताने यावेळी ऑर्बिटर न पाठविता प्रॉप्लशन मॉड्युल पाठवलं होतं. त्यामध्येदेखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिलं असून या इंधनाचा उपयोग करून मॉड्युल चंद्राभोवती पुढील किमान ६ महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.
दक्षिण ध्रुवावर तिरंगा – चांद्रयान- ३च्या यशस्वी लँडिंगने भारत हा दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा जगातील पहिला देश ठरला आहे.. भारतीय तिरंगा तेथे डौलाने फडकत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रीक्स संमेलनासाठी दक्षिण आफ्रिकेत असून तिथून त्यांनी इस्त्रोच्या मोहीमेस व्हर्च्यूअली उपस्थिती लावली. यानाचे लैंडिंग होताच आनंद व्यक्त करत पंतप्रधानांनी सर्व शास्त्रज्ञांना आणि देशवासियांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. त्यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
१२० वेळा चंद्राची प्रदक्षिणा – चांद्रयान- ३ च्या लँडिंगने आतापर्यंत २१ वेळा पृथ्वीची आणि १२० वेळा चंद्राची प्रदक्षिणा पूर्ण केली असून एकूण ५५ लाख किलोमीटरचा हा प्रवास आहे.