कळवंडेसह पाचाड, रेहेळभागाडी वैजी आणि कोंढे गावच्या सर्व ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. धरण दुरुस्तीनंतरच कालव्याचे काम सुरू करण्याची मागणी कळवंडे येथील दत्तमंदिरात झालेल्या बैठकीत चार गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. कळवंडे धरणात उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा पाणीसाठा करण्याचे आश्वासन लघु पाटपबंधारे विभागाने दिले होते; मात्र सध्याच्या स्थितीला धरणात केवळ १५ टक्केच पाणीसाठा आहे. पुढील ३ महिन्यात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उद्भवणार आहे.
धरणदुरुस्ती झाली नसताना कालव्याची कामे सुरू आहेत. याबाबत कळवंडे श्री दत्तमंदिरात लघू पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीस कळवंडे, पाचाड, रेहेळभागाडी वैजी व कोंढे येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ग्रामस्थ म्हणाले, पूर्ण क्षमतेने धरण कधी भरणार याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. धरण सुस्थितीत असताना प्लास्टिकचे अच्छादन टाकून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला. भर पावसाळ्यात प्लास्टिकच्या आच्छादनावरील मातीचा भराव निघाला.
२०१८ पासून धरण दुरुस्तीचा प्रस्ताव होता. या धरणाची दोन वेळा विविध प्रकारची दुरुस्ती झाली. धरणाच्या मूळ जागेलाच पाझर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या पाहणीत गळती असल्याचा दावा उपअभियंता विपूल खोत यांनी केला. कळवंडे गावची जलजीवन मिशन योजनेच्या धरणातील विहिरीची पाणीपातळी घटल्याने गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. जिथे पाणीटंचाई भासेल तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची हमी अधिकाऱ्यांनी दिली.