सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय विधानसभेतील अधिवेशनात विरोधीपक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गट दावा करणार आहे. खा. संजय राऊत यांनी ही माहिती दिली. दरम्यान या पार्श्वभूम ीवर शुक्रवारी सायंकाळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विरोधीपक्षनेतेपदाची माळ गुहागरचे आमदार आणि आक्रमक शिवसेना नेते भास्करशेठ जाधव यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. विरोधीपक्षनेतेपदासाठी किमान २८ आमदार निवडून येणे आवश्यक आहे. मात्र विरोधीपक्षातील एकाही पक्षाचे २८ आमदार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेमध्ये विरोधीपक्षनेतेपद मिळणार नाही असे संकेत सत्ताधाऱ्यांकडून मिळाले होते. मात्र विरोधीपक्षनेतेपदासाठी सदस्य संख्येची कोणतीही अट नाही असा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. काही वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि. बा. पाटील यांना विरोधीपक्षनेतेपद देण्यात आले होते. तेव्हा शेकापचे केवळ ९ आमदार होते, असे उदाहरण खा. संजय राऊत यांनी दिले आहे. आम्ही विरोधीपक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे सांगताना आपल्या मित्र पक्षांशी चर्चा केली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता हो असे उत्तर त्यांनी दिले.
विरोधीपक्षनेतेपद मिळणार? – अशा परिस्थितीत विरोधीपक्षनेतेपद कोणाला द्यायचे याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत. अॅड. राहुल नार्वेकर याबाबतचा निर्णय घेतील. अद्यापही आपल्याकडे कोणीही अधिकृतपणे दावा केलेला नाही, असे नार्वेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. हा निर्णय जरी विधानसभा च अध्यक्ष घेणार असले तरी त्यासाठी प्र सत्ताधारी पक्ष अनुकूल असावा त लागतो. २०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला नियमाप्रमाणे १० टक्के खासदार निवडून न आल्याने मोदी सरकारने विरोधीपक्षनेतेपद दिले नव्हते. कायद्याच्या दृष्टीकोनातून ते योग्यही मानता येईल. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर सरकार अनुकूल नसेल तरीही स्वतःच्या अखत्यारीत हा निर्णय घेऊ शकतील का? या विषयी राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे.
भास्कर जाधवांना पद? – दरम्यान मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी तीन नावांची चर्चा झाली. आदित्य ठाकरे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव ही ती तीन नावे असून भास्कर जाधव यांचा अनुभव बघता आणि त्यांची आक्रमकता पहाता ठाकरे गटाने विरोधीपक्षनेतेपद भास्करशेठ जाधव यांना देण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. भास्करशेठ जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधून उबाठाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील कोकणात १५ पैकी केवळ भास्कर जाधव हे एकटेच निवडून आले. उर्वरित जागा शिंदेंच्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी (अजित पवार) व भाजपने जिंकल्या आहेत. कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पक्षात फूट पडल्यानंतर तो ढासळला आहे. ठाकरे गटाला गळती कोकणातील अनेक माजी आमदार, आजी-माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक हे मोठ्याप्रमाणात ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असताना आणि एकूणच महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाची स्थिती ढासळत चालल्याचे दिसत असताना भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला विरोधीपक्षनेतेपदावर काम करण्याची संधी देऊन शिवसेनेचा आक्रमकपणा पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.