व्यापार, व्यावसायानिमित्ताने लांजा तालुक्यात येणाऱ्या, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या आणि विविध व्यावसायिक क्षेत्रात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशीय घुसखोरांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन लांजा नगरपंचायत, तहसीलदार, पोलिस ठाणे यांना देण्यात आले. बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर भारतात घुसले आहेत व मोकाट फिरत आहेत. बांगलादेशातील हे रहिवासी आपल्या भारत देशातील विविध शहर तसेच खेडे गावांत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत व तेथील बाजारपेठ व विविध व्यावसायिक क्षेत्रात हस्तक्षेप करत आहेत.
तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. लांजा नगरपंचायत हद्दीत बाहेरून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे अनधिकृत वस्त्या व व्यवसाय वाढत आहेत. याचा परिणाम स्थानिक व्यापाऱ्यांवर व बाजारावर होत आहे. या घुसखोरांमुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही दिरंगाई करू नये व तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्रेयस शेट्ये, सचिन कदम, सुशांत रहाटे, रूपेश चव्हाण, अजय सावंत, प्रवीण पावसकर आदी उपस्थित होते.
भाडेकरूंची माहिती घ्या – लांजा शहर व तालुक्यात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या व आठवडा बाजार तसेच इतर दिवशी बाहेरून येणाऱ्या व्यापारी व त्यांच्या कामगारांचे सर्वांची योग्य ती कागदपत्रे तपासून ते भारतातीलच रहिवासी आहेत का ? याची खात्री करून घ्यावी. तसेच भाडेतत्त्वावर ठेवणाऱ्या मालकांनी देखील भाडेकरूंची संपूर्ण माहिती नगरपंचायत व पोलिस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात यावेत.