मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील उखडलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. १७ दिवसांचा कालावधी उलटूनही दुरूस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एकाच मार्गिकवरून दोन्ही दिशांना धावणारी वाहतूक सुरू ठेवावी लागतं असून वाहनांचा वेगही मंदावला आहे. याबाबत वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. २२ जुलैला सायंकाळच्या सुमारास जगबुडी पुलावरील एक मार्गिका मध्यभागीच उखडल्याने प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच मार्गिकवरून सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने ३ दिवसात उखडलेल्या मध्यभागाची दुरूस्ती करून वाहतुकीसाठी पूल खुला करण्याचे संकेत दिले होते. उखडलेल्या मध्यभागी सळ्या टाकून मजबुतीसाठी त्यावर सिमेंट टाकण्यात येणार आहेत. आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दुरूस्ती कामात अडथळा आल्यामुळे काम सुरू करता आले नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. तरीही दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकेवरून वाहतूक खुली करण्यास विलंब होणार, हे निश्चित झाले आहे. सध्या पर्याय म्हणून एकाच मार्गिकेवरून वाहने सोडण्यात येत आहेत. मुंबईहून येणारी वाहतूक कमी असली तरीही वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहनचालकांची प्रसंगी फसगत होत आहे. सुदैवाने, या ठिकाणी अपघात घडलेला नाही. त्यामुळे संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेत तातडीने दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.