खेडमध्ये पाऊस चांगलाच कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नारंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने त्यांच्या पुराचे पाणी कोणत्याही क्षणी शहराच्या बाजारपेठेत घुसेल, अशी भीती व्यक्त होत होती. मशीदीपर्यंत पाणी आल्याने व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्याही पोटात भीतीचा गोळा उमटला होता. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचा धोका सध्यातरी टळला आहे. दरम्यान अजूनही खेड-दापोली मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नाही. खेडला गेले दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला आहे. सोमवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता जगबुडी नदीवरील भरणे नाका पुलाजवळ पाणीपातळी ७.४० मीटरपर्यंत पोहोचली, जी धोक्याच्या ७ मीटर रेषेपेक्षा अधिक आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे, अशी माहिती प्रशासनाने सोमवारी सकाळी दिली. खेड नगरपरिषदेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना तातडीचा इशारा देत सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते.
आवाशीचा संपर्क तुटला – खेड तालुक्यातील आवाशी गावच्या काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गच्या चुकिच्या कामामुळे आवाशी गावामध्ये पाणी शिरल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. आवाशी गावची जिल्हापरिषद शाळा पाण्याखाली गेली होती. गावातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते.
वाहतूक ठप्प – खेड-दापोली मार्गावरील नारगोली येथे झाड कोसळल्यामुळे काही काळ मार्ग बंद होता. सध्या एकाच लेनवर वाहतूक सुरू असून, झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. तसेच खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला होता. पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला होता.
शाळांना सुट्टी – खेड तालुक्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सोमवारी तातडीने सुट्टी जाहीर केली. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद खेड तालुक्यातच झाली आहे. सोमवारी दिवसभरात येथे १७० मिमी पाऊस पडला असून, गेल्या ४८ तासांत खेडमध्ये एकूण ३४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
प्रशासन सतर्क – नदी-नाले भरून वाहू लागले असून, पुराची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच निर्णय घ्यावेत, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.