कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे, यासाठी उर्वरित महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचीही जोड असेल. यामुळे कोकण विकासाला चालना मिळून कोकणवासियांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी जयगड पोर्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ना. नितेश राणे यांनी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, मत्स्यव्यवसाय, बंदर विभाग, कृषी, अपेडा, मित्रा या संस्थांचे प्रतिनिधी, कोकण रेल्वे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची अत्यंत महत्वाची बैठक जयगड येथे घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
ना. नितेश राणे म्हणाले की, या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जयगड बंदराचा विकास कसा करता येईल, यावर सखोल चर्चा झाली. जयगड बंदरांचा वापर आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक सक्षम केंद्र म्हणून करणे हे गरजेचे आहे. सध्या या उत्पादनांची निर्यात मुख्यतः उरण येथील जेएनपीए बंदरातून होते. मात्र, त्यामुळे वाहतूक खर्च आणि लॉजिस्टिक्स मोठ्या प्रमाणात वाढतो. या खर्चाला आळा घालण्यासाठी आणि स्थानिक उत्पादकांना फायदा होण्यासाठी जयगड बंदराला जेएनपीएला एक सक्षम पर्याय म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हे बंदर अधिक सक्षम करण्यासाठी या बैठकीत बंदराच्या विकासासाठी ‘आवश्यक असलेल्या सवलती आणि मदतीबाबतही चर्चा झाली, असे ना. नितेश राणे म्हणाले.
कोकणाला संपूर्ण महाराष्ट्राशी जोडणारा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग या बैठकीत चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होता. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचा या रेल्वे मार्गासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास कोकणचा विकास अधिक वेगाने होईल आणि जयगड बंदराला त्याचा मोठा फायदा होईल, त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जाईल असे ना. नितेश राणे म्हणाले. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या संकल्पना मांडण्यात आल्या आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यात येईल, या बैठकीचा उद्देश केवळ बंदराचा विकास नसून, परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे जीवनमान व आर्थिक क्षमता उंचावणे हा होता, असेही ना. नितेश राणे यांनी सांगितले.

