सहकारी चळवळीच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात दुग्ध उत्पादनात श्वेतक्रांती होत असताना पशुसंवर्धन विभागाची अपुरे कर्मचारी व पशुवैद्यक शास्त्राच्यादृष्टीने आवश्यक साधनांचा अभाव आहे. महत्त्वाची पशुधन विकास अधिकाऱ्यांची तब्बल आठ पदे रिक्त असल्याने पशुसंवर्धनाला बळ मिळालेले नाही. गेल्या काही वर्षांत तालुक्यात दुग्ध उत्पादने व दुधाळ जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय दवाखाने नाहीत अथवा तशी सोय नाही. त्यामुळे पाळीव पशुधनास आजार झाल्यास दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्यात उपलब्ध शासकीय सोयीसुविधांवरच अवलंबून राहावे लागते. तालुक्यात मंडणगड, लाटवण, शेनाळे, कुंबळे, दहागाव, म्हाप्रळ, पालवणी, देव्हारे, वेळास हे ९ दवाखाने असून, यातील ६ दवाखाने राज्य शासनाचे, तर ३ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत तसेच मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या माध्यमातून फिरता दवाखाना आहे. यामध्ये एकूण ३३ पदे मंजूर आहेत, यातील केवळ ११ पदे भरण्यात आली आहेत. २१ कर्मचाऱ्यांची पदे शासकीय भरती होत नसल्याने रिक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे पशुधन विकास अधिकारी यांची आठ पदे, पशुधन पर्यवेक्षक यांची ७ अशी एकूण १५ महत्त्वाची पदे दवाखाना सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असताना भरली गेलेली नाहीत. पाच शिपायांची पदे रिक्त आहेत.
सद्यःस्थितीत तालुक्यात तालुक्याचे केवळ तीन पशुधन विकास अधिकारी व तीन पशुधन पर्यवेक्षक तालुक्याचा कारभार पाहात आहेत. तालुक्याची डोंगराळ संरचना लक्षात घेता हा आकडा कार्यरत कर्मचाऱ्यांवर जास्तीच्या कामाचा भार टाकणार आहे. पाळीव कुत्रे व मांजर हे प्राणी आजारी पडल्यास वा दुखापतग्रसत झाल्यास दवाखान्यात आणले जातात. गाई, म्हशी, बैल इत्यादी प्राण्यांना आजार झाल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवर जावे लागते. त्यात बराच वेळ वाया जातो. त्यामुळे कर्मचारी भरतीचा रिक्त अनुशेष तातडीने भरून काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाळीव पशुधनास गंभीर आजार झाल्यास अथवा तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास तशी सोय केवळ तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. पाळीव पशुधनाचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी कालसंगत गरजेच्या तांत्रिक साधनांचीही अडचण येते याशिवाय विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार व प्रशासकीय कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करण्यातही कर्मचाऱ्यांचा वेळ खर्च होतो.

