रत्नागिरी जि. प. चे भूतपूर्व अध्यक्ष व ठाकरे शिवसेनेचे ‘हेवीवेट’ नेते श्री. जयसिंग तथा आबासाहेब घोसाळे यांनी आज पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. श्री.. जयसिंग घोसाळे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करुन त्यांचे स्वागत केले.
भूतपूर्व जि.प.अध्यक्ष – श्री. जयसिंग तथा आबासाहेब घोसाळे हे रत्नागिरी जि.प.चे भूतपूर्व अध्यक्ष होत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी जिल्हाभरातील अनेक विकास कामे मार्गस्थ केली. रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंचायतीवर भगवा फडकवणारे पहिले नेते म्हणून ते ओळखले जातात. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ते कट्टर शिवसैनिक म्हणून सर्वांना परिचित होते.
शिवसेनेत प्रवेश – आज रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहावर एका छोटेखानी कार्यक्रमात पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचेसोबत ठाकरे शिवसेनेचे काही शिवसैनिक तसेच श्री. अनिल घोसाळे आदी मान्यवर उपस्थित होते. ना. उदय सामंत यांनी श्री. जयसिंग घोसाळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
साजेसा मानसन्मान – यावेळी श्री. जयसिंग घोसाळे यांचे स्वागत करताना पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणारे कट्टर शिवसैनिक श्री. जयसिंग घोसाळे यांचे मी शिवसेनेत – मनःपूर्वक स्वागत करीत आहोत. त्यांना साजेसा मानसन्मान दिला जाईल. तसेच विकास कामांबाबत त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल” अशा शब्दात त्यांनी आपली मनोभावना व्यक्त केली.
सामंतांचे कार्य प्रभावी – यावेळी श्री. जयसिंग तथा आबासाहेब घोसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे प्रभावी जनकल्याणाचे कार्य ध्यानी घेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. आमची सदैव विकासाला साथ असेल” अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले.