कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य रेल्वेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ‘जल फाउंडेशन कोकण विभाग’ या संस्थेने दादर रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. दि. २ ऑक्टोबर, २०२५ रोजी हे उपोषण होणार असून, प्रवाशांच्या मागण्या मान्य न झाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जांधव यांनी व्यक्त केला आहे. प्रमुख मागण्यांमध्ये रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरपर्यंत चालवा, १९९६ पासून सुरू असलेली आणि मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या नावाखाली अचानक बंद करण्यात आलेली ५०१०३/५०१०४ रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादरपर्यंत चालवण्याची प्रमुख मागणी आहे. या गाडीमुळे कोकणातील प्रवाशांना म बईपर्यंत थेट प्रवास करणे सोपे होते. मुंबई -चिपळूण दरम्यान नवीन गाडी सुरू करा, मुंबई आणि चिपळूण दरम्यान एक नवीन दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गाडीमध्ये द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार आणि सामान्य अनारक्षित डबे असावेत. ही गाडी दादर, ठाणे, पनवेलसह रोहा, खेड आणि अंजनी अशा अनेक महत्त्वाच्या थांब्यांवर थांबावी.
प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी मुंबईतून पहाटे लवकर सुटून चिपळूणहून दुपारी किंवा सायंकाळी परत फिरावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. ‘नमो भारत’ किंवा ‘वंदे मेट्रो’ सारख्या आधुनिक रेल्वेने ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा मोठा फायदा होईल, असेही सूचित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ‘जल फाउंडेशन’ सातत्याने मध्य रेल्वेकडे या मागण्यांचा पाठपुरावा करत आहे. या संदर्भात अनेक पत्रव्यवहारही करण्यात आले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग निवडण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. ‘जल फाउंडेशन’चा हा उपोषणाचा इशारा कोकणच्या रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडणारा ठरू शकतो. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. रत्नागिरी पॅसेंजर सारखी जुनी आणि लोकप्रिय गाडी पुन्हा सुरू झाल्यास आणि एक नवी मुंबई-चिपळूण गाडी सुरू. झाल्यास कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.