चिपळूण तालुक्यातील उमरोली -रामपूर जिल्हा परिषद गटाचा शिवसेना मेळावा बुधवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते, आमदार भास्करशेठ जाधव यांचे अत्यन्त जवळचे सहकारी, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. माजी तालुका प्रमुख जितेंद्र चव्हाण यांच्यासोबत माजी उपतालुका प्रमुख महादेव मोरे, विद्यमान उपतालुका प्रमुख लक्ष्मण कोकमकर, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अक्षता साळवी, रामपूर महिला आघाडी प्रमुख डॉ. वर्षा चव्हाण, पंचायत समिती सदस्य अनुजा जितेंद्र चव्हाण, माजी विभागप्रमुख अनिल साळवी, रामपूरच्या विद्यमान सरपंच अमिता अशोक चव्हाण, तसेच आजी-माजी सरपंच, शाखाप्रमुख आणि सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना माजी तालुका पालकमंत्र्यांना प्रमुख जितेंद्र चव्हाण म्हणाले, मी विकासकामांसाठी भेटायला गेलो होतो. याबाबत आमदार भास्करशेठ जाधव यांनी विचारणा केली असता मी स्पष्ट सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी माझी हकालपट्टी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यावरून पक्ष नेमका कोण चालवतो, निर्णय कुठून होतात, असां प्रश्न निर्माण होतो. मी २७ वर्षे पक्षासाठी काम केले. आमदार भास्करशेठ जाधव चार वेळा निवडून येण्यासाठी आम्ही छातीचा कोट करून लढलो. मात्र त्याची किंमत त्यांना राहिली नाही. त्यामुळे आता मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे. यावेळी त्यांनी बचत गटांसाठी ग्रामसंघाची इमारत उभारून द्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. पालकमंत्री ना. उदय सामंत म्हणाले, तुम्ही शिवसेनेत आलात याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही, याची मी खात्री देतो. आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामसंघाच्या इमारतीसाठी जिल्हा नियोजनमधून २५ लाख रुपये देण्यात येर्तील.
तसेच पक्ष वाढताना वाद होतात, मात्र नेते एकनाथ शिंदे, चिन्ह धनुष्यबाण हे लक्षात ठेवून विकासासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यास माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती बाळशेठ जाधव, मा. तालुकाप्रमुख संदीप सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश घाग, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, मा. पं. स. सदस्य राकेश शिंदे, चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक निहार कोवळे, कपिल, शिर्के, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ऋतुजा खांडेकर, मा. पं. स. सदस्य अनुजा चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

