मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. हे काम करताना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढलेले आहेत; मात्र त्या पर्यायी मार्गावर भलेमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास खडतरच होणार आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करताना जुना डांबरी रस्ता खोदण्यात आला आहे. तिथे बाजूने पर्यायी रस्ता केलेला आहे. त्या पर्यायी मार्गावर काही ठिकाणी तात्पुरती डांबराची मलमपट्टी केली होती.
पावसाळ्यात त्या पर्यायी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. तिथे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन ठेकेदारांना सूचना देणे गरजेचे आहे. या रस्त्यालगत संरक्षण भिंत घालताना बाजूच्या रस्त्यावर माती टाकल्यामुळे तिथे वाहने चालवताना अडचणी येत आहेत. या मार्गावरून किमान दोन वाहने जाऊ शकतील, असा रस्ता होईल अशी काळजी घेतली पाहिजे. नव्याने तयार केलेला मार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत पर्यायी मार्गाचे तत्काळ उपाययोजना केल्या तर वाहनचालकांना त्याचा फायदा होईल.
काही ठिकाणी पुलाचे बांधकाम चालू असताना तिथे सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अपघात होऊ शकतो. aगणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा रेलचेल असते. या परिसरात योग्य व्यवस्था केली गेली नाही तर वाहतूककोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.