25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeRatnagiriकाजळी नदीतील गाळ काढण्याची मागणी, उद्भवू शकतो पूराचा धोका

काजळी नदीतील गाळ काढण्याची मागणी, उद्भवू शकतो पूराचा धोका

हाच गाळ वाहात येऊन सोमेश्वर, काजरघाटी, चिंचखरी येथे साचत असल्याने येथे ओहोटीच्यावेळी नदीतून चालत पलीकडे जाता येईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.

चिपळूण तालुक्यात गेल्यावर्षी आलेल्या महापुरानंतर यंदा पावसाळ्याच्या आधी गेले आठ महिने नद्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी आत्तापर्यंत तरी चिपळुणात फार पाणी भरलेले नाही. यावर्षी पाऊस चांगला पडला असला तरी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात एकदाच पाऊस पडला. त्या दिवशीच फक्त पाणी भरले होते. परंतू गाळ काढल्यामुळे पाणी न  भरल्याने फारसे नुकसान झालेले नाही. अशाच प्रकारे काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी येथील काजळी नदीतील गाळ काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यातील चिंचखरी, गुरुमळी, सोमेश्वर, काजरघाटी  गावांमधून वाहणारी काजळी नदी गाळाने तुडुंब भरली आहे. गेल्या वर्षी चांदेराई येथे पूर येत असल्याने तेथील गाळ काढण्यात आला. मात्र तो काठावरच उपसा करून ठेवल्याने यावर्षीच्या पावसात तो पुन्हा नदीपात्रातच गेला. हाच गाळ वाहात येऊन सोमेश्वर, काजरघाटी, चिंचखरी येथे साचत असल्याने येथे ओहोटीच्यावेळी नदीतून चालत पलीकडे जाता येईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.

संगमेश्वर तालूक्यातील साखरपा येथील काजळी नदीतील गाळ काढल्यानंतर तेथील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्याने या नदीवर दोन्ही बाजूला आता दगडी संरक्षक बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. अर्धे काम पूर्ण झाल्याने खारे पाणी भातशेतीत घुसण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी गाळामुळे नदीपात्र उथळ झाले आहे. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी पाणी पात्राबाहेर पडते आणि मळ्यात घुसते. त्यामुळे भातशेती, रब्बी पिकाचेही नुकसान होत आहे.

येथील स्थानिक ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने भातशेती, नारळ, कुळीथ, कडवे, पावटे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणि बारमाही केला जातो. मात्र यापूर्वी खारे पाणी घुसल्याने येथील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. गाळामुळे नदीपात्रात मोठी बेटे तयार होऊ लागली आहेत. वाशिष्टी नदीप्रमाणे काजळी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular