तालुक्यातील कोंढे माळवाडी येथे कापणी केलेले भातपीक शेतात पसरून ठेवलेले असतानाच अचानक कळवंडे धरणाचे पाणी कॅनलमार्फत चेंबरमधून बाहेर पडून शेतात घुसल्याने पिकाची प्रचंड हानी झाली. हातातोंडाशी आलेला घास, असा हिरावल्याने बाधित शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेले दोन दिवस हे पाणी सुरू असून, हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणात मुबलक पाणीसाठा नसताना ते पाणी कोणी सोडले, याबाबतचा शोध स्थानिक ग्रामस्थ घेत आहेत. या प्रकारामुळे शेतकरी सुधाकर किळजे व सुधाकर नलावडे यांचे नुकसान झाले आहे. कळवंडे येथील धरणाची सध्या दुरुस्ती सुरू आहे. या धरणाच्या पाण्यावर कळवंडेवासीयांची तहान भागवली जात असून कळवंडे, कोंढेमाळवाडी येथील शेती, फळबागायतीही याच पाण्यावर अवलंबून आहेत.
धरणापासून कोंढे माळवाडीपर्यंत कॅनलद्वारे पाणीपुरवठा होतो. यासाठी ठिकठिकाणी चेंबर्स ठेवण्यात आले आहेत. हे चेंबर्स स्थानिकांच्या शेतजमिनीलगतच आहेत. सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कळवंडे धरण चर्चेत आले आहे. पाटबंधारे विभागाकडून या कामाची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे – पावसाळ्यात या धरणात पाणीसाठा शिल्लक नव्हता. अधिकाऱ्यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून पाणीसाठा करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या धरणात ५० टक्केही पाणीसाठा झालेला नाही. भविष्यात कळवंडेसह परिसरात पाणीटंचाई शक्यता निर्माण झाली आहे. धरणातील पाण्याचा काटकसरीने उपयोग व्हावा, अशी आशा स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी करत असतानाच एक गंभीर प्रकार कोंढे माळवाडी येथे मंगळवारी समोर आला.
सध्या भातकापणीचा हंगाम सुरू आहे. त्यानुसार या परिसरातील शेतकरीही कापणीच्या कामामध्ये व्यस्त आहे. कापणी केलेले भात सुकण्यासाठी शेतकरी सुधाकर किळजे व सुधाकर नलावडे यांनी शेतातच ठेवले होते तर उर्वरित भातकापणी केली जात होती. या दरम्यान, मंगळवारी कळवंडे धरणाकडून येणाऱ्या पाण्याच्या चेंबर्समधून पाण्याचा फवारा उडू लागला. पाहता पाहता हे पाणी थेट शेतात शिरले. त्यामुळे शेतात कापून ठेवलेले भातपीक पूर्णतः भिजले, यामध्ये धान्याची नासाडी झाली तर बुधवारीही दिवसभर ते पाणी सुरूच होते. भातशेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले तर काही शेतात पाणी शिरल्याने भातकापणीची कामे ठप्प करावी लागली आहेत. हे पाणी कोणी सोडले, याचा शोध स्थानिक नागरिक घेत आहेत.