चिपळूण तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज नेहमीच हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहिला; मात्र आता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानातून कातकरी समाजास हक्काचा निवारा मिळणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तत्काळ मंजुरी देऊन घरकुलासाठी ९० हजारांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जात आहे. या कातकरी समाजास घरकुलासाठी तब्बल २ लाख ३९ हजारांचा निधी मिळणार आहे. तालुक्यात २२ गावांत कातकरी समाजाची ४७५ कुटुंबे असून, त्यांतील ४१ घरकुलांना मंजुरी दिली असून काहींनी घरांची कामेही सुरू केली आहेत. कातकरी, मारीचा गोंड व कोळम समाजासाठी हे अभियान आहे. यातील केवळ कातकरी समाजाच जिल्ह्यात वास्तव्याला आहे.
तालुक्यात आकले, अलोरे, दळवटणे, कादवड, कळकवणे, कालुस्ते, केतकी, कोळकेवाडी, कोंढे, कुंभार्ली आदी २२ गावांतील ३० वाड्यांमध्ये कातकरी समाजाचे वास्तव्य आहे. कातकरी समाजाची एकूण ४७५ कुटुंबे आहेत. ज्यांना जागा मिळाली त्यांनी यापूर्वी शबरी आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेतला आहे; मात्र आजही अनेक कुटुंबे बेघर असून डोंगरदऱ्यात, झोपडीत वास्तव्याला आहेत. कोळकेवाडीसारख्या ठिकाणी पडक्या शासकीय इमारतीत काही कुटुंबे गुजराण करत आहेत. या अभियानात कातकरी कुटुंबास २ लाख ३९ हजारांचा निधी मिळणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ ९० हजारांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे.
घरकुलाचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी काही महिने प्रतीक्षा करावी लागत होती. आता कातकरी समाजाला घरकुलाचा लाभ देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विस्तार अधिकारी, ग्रामसेवक कातकरी वस्तीत पोहोचून सर्वेक्षण करीत आहेत. पूर्वी कातकरी समाजातील कुटुंबांना जातीच्या दाखल्याची अडचण होती; मात्र गेल्या काही वर्षांत कातकरी कुटुंबांनी जातीचे दाखले मिळवले आहेत.