27.2 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeMaharashtraविनाशकारी भूस्खलन, केरळच्या वायनाड जिल्ह्यात १२३ जणांचा मृत्यू

विनाशकारी भूस्खलन, केरळच्या वायनाड जिल्ह्यात १२३ जणांचा मृत्यू

कन्नूरहून लष्कराची २२५ जणांची तुकडीही दाखल झाली.

केरळच्या निसर्गसुंदर वायनाड जिल्ह्यावर आज आभाळ फाटले. मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजता चार गावांत भूस्खलन झाल्याने १२३ जणांचा गाढ झोपेत मृत्यू झाला, तर १२८ हून अधिक जखमी झाले. या भूस्खलनात ही चारही गावे ढिगाऱ्याखाली अक्षरशः गाडली गेली. घर, पूल, रस्ते आणि गाड्या वाहून गेल्या. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून, शंभरांहून अधिक जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर केली आहे.

वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी उद्या (ता. ३१) घटनास्थळाला भेट देणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सर्व शासकीय यंत्रणांना मदतीसाठी पाठविले असून, घटनास्थळी अन्नधान्यांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुडक्कई, चुरलमला, अट्टमला आणि नूलपुझ्झा गावांसाठी मंगळवारची पहाट भयानक ठरली. चार तासांत तीन वेळा मोठे भूस्खलन झाले. या गावांतील शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. एकट्या चुरलमला गावातील दोनशे घरांची पडझड झाली. शेकडो नागरिक अजूनही दलदलीत अडकले आहेत. नदीवर तरंगणारे मृतदेह, तुटलेले पूल आणि वाहून गेलेले रस्ते असे भयावह चित्र आज सकाळी या गावात दिसत होते.

या घटनेची माहिती समजताच प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या. कन्नूरहून लष्कराची २२५ जणांची तुकडीही दाखल झाली. यात वैद्यकीय पथकाचा देखील समावेश आहे. शिवाय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर देखील बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले. मात्र हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरला कोझिकोडला परत आले. पाच वर्षापूर्वी २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे याच गावात भूस्खलन झाले होते. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. पाच जणांचा शोध अद्याप लागला असून ५२ घरांची हानी झाली होती. मुंडक्कई गावाला भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणी बचाव पथक पोचण्याचा प्रयत्न करत आहे.

एनडीआरएफचे पथक पायवाटाने गावी पोचत आहे. मुंडक्कई येथे अडीचशेहून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून या ठिकाणी असंख्य घर वाहून गेले आहेत. या गावात ६५ कुटुंब असून तेथील चहामळ्यात काम करणारे ३५ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. जिल्हा पंचायत अध्यक्ष समशाद मरईक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडक्कईला रस्ते मार्गाने सध्यातरी मदत पोचवता येणार नाही. मोबाईल नेटवर्कही ठप्प पडले आहे. काहींना वाचण्यात यश आले आहे. यात दोन परकी नागरिकांचा समावेश आहे. ते एका घरात थांबले होते. या ठिकाणी बचाव पथक प्रत्येक ठिकाणची तपासणी करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular