खेड तालुक्यातील भरणे येथील सुकिवली येथे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उमा वूड इंडस्ट्रीज कारखान्यातील वीजपुरवठ्या संदर्भात ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नसताना, कारखान्याचे मालक प्रकाशकुमार नरसिंह पटेल यांनी ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के बनवून आणि खोटी सही मारून महावितरणकडे खोटा ना हरकत दाखला देत, वीज पुरवठा कनेक्शन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. महावितरण वारंवार अशा वीज चोरी करणाऱ्यांचा शोध घेत असते.
यासंदर्भात भरणेच्या सरपंच शीतल संजय चाळके यांनी येथील पोलीस स्थानकात कारखाना मालक प्रकाशकुमार नरसिंह पटेल यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलीस स्थानकात सरपंच चाळके यांनी रितसर तक्रार दाखल करून देखील महिनाभराचा कालावधी उलटून जाऊन सुद्धा कारखाना मालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.
या कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडेही ग्रामस्थांनी वारंवार लेखी तक्रारी देऊन सुद्धा जिल्हा प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत ठिकठिकाणी निषेध फलक लावले होते. त्याचप्रमाणे संबंधित कारखान्याच्या मालकावर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या कारखान्यास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याशिवाय ग्रामस्थांनीही कारखान्याच्या मालकाच्या फसवणुकीच्या कृत्याचे कागदी साक्षी पुरावेदेखील प्रशासनाकडे सादर केले आहेत. ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून फसवणूक प्रकरणी अखेर कारखाना मालक प्रकाशकुमार नरसिंह पटेल यास रात्री स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी प्रकाशकुमार नरसिंह पटेल यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.