टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून दाखवत असलेल्या अनेक मालिकांच्या आधारे, सत्य जीवनामध्ये देखील अनेक जण त्याची कृती करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये विशेष करून तरुणाई अग्रेसर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील १७ वर्षीय मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खेड पोलीस ठाणे येथे एका इसमाने महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय पुतण्याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. ‘माझ्या पुतण्याला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्याने भयभीत आवाजात सांगितले की, मला चोरांनी परजिल्ह्यात पकडून नेले आहे आणि त्यांच्या तावडीतून मी कशीबशी सुटका करून घेतली आहे. सध्या मी एका ठिकाणी आश्रय घेत आहे. एवढे बोलून त्याचा संपर्क तुटला.
बाबतची तक्रार आल्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पोलीस पथक नेमण्यात आल्यानंतर हा सगळा बनाव उघड झाला. स. पो. नि. सुजीत गडदे, खेड पोलीस ठाणे यांनी आपल्या वरिष्ठांना या घटनेबाबत तात्काळ कळवले. व गुन्ह्याचा तपास तात्काळ सुरू करण्यात आला. रातोरात हे पथक आपल्या शेजारील जिल्ह्यामध्ये पोहोचले. या पथकाद्वारे तेथील सर्व हॉटेल्स व विश्रामगृहांचा शोध घेण्यात आला.
अखेर त्या १७ वर्षीय मुलाला शोधण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले. मुलाला ताब्यात घेताच घटनेला वेगळेच वळण मिळाले. पोलिसांनी अपहरणाबाबत या मुलाकडे चौकशी केली यावेळी त्याने दिलेले उत्तर हे धक्कादायक होते. १२ वीचे शिक्षण घ्यायची इच्छा नसल्याने सदर तरुणाने हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालं आहे. मुलाने सांगितले की, मला इयत्ता १२वी च्या शिक्षणामध्ये कोणत्याच प्रकारचे स्वारस्य नाही आणि ‘आय. टी. आय’चे शिक्षण घ्यायचे आहे. मात्र आपल्या घरातील कोणालाच हे सांगू शकत नाहीय आणि त्याच नैराश्यातून मी घर सोडून निघून आलो व मला चोरांनी परजिल्ह्यात पकडून नेल्याचा मी बनाव रचला.