खेड, दापोली शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये बीएसएनएल सेवेसह खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा गेल्या काही दिवसांपासून पुरता बोजवारा उडाला आहे. सेवेत सुरळीतपणा आणण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने ग्राहकाना त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएल सेवेचा गेल्या काही वर्षांमध्ये पुरता बोजवारा उडाला असून, दिवसभरात नक्की कोणत्या वेळी बीएसएनएलची सेवा सुरू असते, अशी विचारणा त्रस्त ग्राहकाकडून केली जात आहे.
बहुतांश शासकीय कार्यालयांसह बँकांमध्ये बीएसएनएलचीच नेट उपलब्ध आहे. ही सेवा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा खोळंबा होत आहे. शिवाय नेटअभावी बँकांचे व्यवहारदेखील कोलमडत असल्याने ग्राहकांना तासनतास कार्यालयातच ताटकळत रहावे लागत आहे. बीएसएनएलकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सेवेत सातत्य आणण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षांपासून या यंत्रणेचा बोजवारा उडाला असून कधी रेंज आहे तर नेट नाही. बरेचवेळा दोन्हीही नाही, अशी भीषण परिस्थिती आहे.
बीएसएनएल सेवेपाठोपाठ खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचेही तीनतेरा वाजले आहेत. खासगी कंपन्यांची मोबाईल सेवाही खंडित होत आहे. या सेवांमध्ये देखील सुरळीतपणा आणण्याच्या दृष्टीने कोणीच पुढाकार घेत नसल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे. बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांनी सेवेत येणारा व्यत्यय दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी ग्राहकांनी केली आहे.
बाजारपेठेत बँक, पतसंस्था, सायबर कॅफेसारखे इंटरनेटवर अवलंबून असणाऱ्या सेवेसाठी दूरच्या गावातून शेतकरी, कष्टकरी दिवसाचा काम बाजूला ठेवून हजेरी लावत असतात. पण काही वेळा नेट नसल्याने ५ मिनिटाच्या कामासाठी देखील २-३ तास थांबावे लागते तर काहीवेळा दुसरा दिवस मोडून परत त्याच कामासाठी परत यावे लागते. या सेवांमध्ये सातत्य आणण्यासाठी शासन अथवा लोक प्रतिनिधी देखील पुढाकार घेत नसल्याने जनतेने नाराजगी व्यक्त केली आहे. ग्राहकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचे आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानाने कोणालाच फरक पडत नसल्याचे दिसून येते आहे.