जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियाना पाठोपाठ माझी वसुंधरा अभियानांतर्गंतही प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत असून, स्वच्छतेविषयक जनजागृती केली जात आहे. या माझी वसुंधरा अभियानमध्ये खेड पालिकेला ८२ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यातून येथील नगरपालिकेला नवव्या क्रमांकाचा बहुमान, तर महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त झाला.
नगरपालिकेचे कचरा प्रकल्पाचे अजून काहीही व्यवस्थापन होत नसून, शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना पालिका प्रशासनाची हालत बेकार होत आहे. मात्र उपलब्ध साधन साम्रुगीसह स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत शहर कसोसीने स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. खेड पालिका कोकणात क वर्ग नगरपालिकांमध्ये सरस ठरत देशपातळीवर कचरामुक्त शहरासाठी ३६ वे मानांकन प्राप्त केले आहे.
याशिवाय गतवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात झोनमध्ये १६ वा, तर राज्यात ९ वा क्रमांक प्राप्त केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, देवानंद ढेकळे, प्रमोद ढोरजकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, माजी आरोग्य सभापती प्रशांत कदम, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर व सर्व माजी नगरसेवक, अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानातून शहरात नानाविध उपक्रम राबविण्यात आले. याचमुळे पाच राज्यांतून ९ वा तर महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. खेड पालिकेच्या या यशाबद्दल खेडवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांनी राखलेली स्वच्छता आणि राबवलेल्या मोहिमेबद्दल इतर तालुक्यांनी देखील माहिती घेऊन आचरण करावे.

