येथील रेल्वेस्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून, स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे खेड रेल्वेस्थानक परिसर कात टाकतोय. या नूतनीकरणात खेड रेल्वेस्टेशन येथे रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वतंत्र थांब्याची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या मार्गाने स्वतंत्र वाहने मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेचा उडणारा गोंधळ कमी होणार आहे. रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने कंबर कसली आहे.
यामुळे रेल्वेस्थानकाचा परिसर आकर्षक बनणार असून प्रवाशांना देखील सुविधा मिळणार आहेत. येथील रेल्वेस्थानक नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. येथील स्थानकातून काही दिवसांपूर्वीच रो-रो सेवा देखील सुरू झाली आहे. यामुळे मालवाहतुकीच्यादृष्टीने रेल्वेस्थानक महत्वपूर्ण ठरले आहे. वाढत्या गर्दीचा विचार करता रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यापूर्वीचा निमुळता रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला असून, या ठिकाणी दुपदरी काँक्रिटीकरणाचा रस्ता बनवण्यात आला आहे.
नजीकच्या इमारतीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणानंतर नवा साज चढणार आहे. रेल्वेस्थानकाचे सौंदर्यदेखील खुलून दिसणार आहे याशिवाय रेल्वेस्थानकाच्या आवाराचा विस्तार होणार असल्याने प्रवाशांच्या वाहनांचा पार्किंगचा प्रश्नदेखील कायमचा मिटणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता आशा जटाळ, अभियंता नीलेश पावसे, सुशांत कुलकर्णी, प्रमोद जगदाळे, अमोल धुमाळ यांच्यासह विभागाचे सर्व कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.
असे असेल रेल्वेस्थानक – खेड स्थानकाकडे जाताना महामार्गालगत एक भव्य स्वागतकमान उभारण्यात येणार असून, दुसरी स्वागतकमान भोस्तेमार्गे खेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणार आहे. संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, रस्त्याला अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टिम तयार करण्यात येणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था तर मुलांना मनोरंजनासाठी गार्डन तसेच पर्यटकांसाठी सेल्फीपॉईंट सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत.