खेडमध्ये नोकरीसाठी मंगळवेढा जि. सोलापूर येथून आलेल्या शिक्षकाच्या प्रतापाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या शिक्षकाने तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण करून तिला व्हीडिओ कॉल करून धमकावले. या प्रकरणी शिक्षकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात दि. १८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे दि. २ डिसेंबर २०२१ ते दि १० जानेवारी २०२२ या कालावधीत श्रीकांत बिरा मासाळ सध्या रा. भरणेनाका, ता.खेड या शिक्षकाने लैंगिक शोषण केले. व्हाट्सएपवर मेसेज करून तिला शिवीगाळ केली. तसेच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांन याबाबत सांगितले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दि. १८ रोजी पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.
तालुक्यात धक्कादायक प्रकार तक्रारींनंतर उघडकीस आला असून खळबळ उडाली आहे. बुधवार दि. १९ रोजी न्यायालयाने पोलिस कोठडीतून पंधरा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना हल्ली सगळीकडेच वारंवार घडत असल्याने शिक्षकांबद्द्ल विद्यार्थिनींच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे. सगळेच गुरुजन वर्ग असे नसतात, परंतु अशा काही विक्षिप्त शिक्षकांमुळे संपूर्ण शिक्षकी पेशाला गालबोट लागते. त्यामुळे अशा शिक्षकांवर योग्य वेळी कारवाईकेल्याने इतर अशाच प्रकारच्या शिक्षक वर्गाला सुद्धा वेळीच चाप बसेल.