फिनेल च्या बॉटल वरून महिला विक्रेता व एका तरुणांमध्ये हुज्जत झाली आणि त्याचे पर्यवसन थेट दोन गटातील वादात झाले. आठवडा बाजारात जोरदार राडा झाला. विक्रेता आणि ग्राहक दोन्ही खेर्डी येथील स्थानिक असल्याने दोन्ही बाजूने अनेकजण धावून आले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्वांना चिपळूण पोलीस ठाण्यात आणले, तसेच पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील तैनात करण्यात आली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी जमा होती. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खेर्डी येथील एक महिला आपले कुटुंब चालवण्यासाठी येथील आठवडा बाजारात फिनैल तसेच तत्सम सफाईचे साहित्य विक्रीचा व्यवसाय करते, नेहमीप्रमाणे बुधवारी देखील तिने आपला स्टॉल खेडी आठवडा बोजारात लावला होता.
युवकाने घातला वाद – संध्याकाळी खेर्डी येथील एक तरुण त्याठिकाणी फिनेल खरेदी करण्यासाठी आला होता. फिनेल ची बॉटलचा दर ३० रुपये असल्याचे त्या विक्रेता महिलेने सांगताच ग्राहक असलेल्या तरुणाचा पारा चढला, २५ रुपये दर असताना तू ३० रुपये का घेत आहेस असे सांगत त्याने चक्क त्या महिलेशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी फॉरेनवरून आलोय, जास्त बोलू नकोस, असे सांगत त्याने चक्क २५ रुपये त्या महिलेच्या अंगावर फेकून दिले आणि फिनेल बॉटल घेऊन निघाला, परंतु त्या महिलेने पैसे परत देत फिनेल बॉटल परत देण्यासाठी विनंती केली असता त्याने थेट अरेरावीची भाषा करत त्यामहिलेवर हात उचलला आणि पुढील नाट्य घडले, असे प्रत्यक्षदर्शीनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
तरुण धावून आले – महिला स्थानिक असल्याने तिने नातेवाईकांना कळवले त्यामुळे स्थानिक तरुण तात्काळ धावत आले, तर तो तरुण देखील स्थानिक असल्याने त्याचे नातेवाईक देखील बाजारात दाखल झाले आणि जोरदार राडा सुरू झाला,, परिस्थिती तणावपूर्ण बनली, परंतु चिपळूण पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली तसेच दोन्ही गटातील लोकांना चिपळूण पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली होती. तसेच खेर्डी येथे पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत चर्चा तसेच गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.