निधीअभावी रखडलेल्या रत्नागिरीतील जिल्हा क्रीडासंकुलाच्या कामाला गेल्या काही महिन्यात वेग आला आहे. या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉलसारख्या मैदानी खेळांसाठी इनडोअर क्रीडांगण उभारले जात आहे. त्यामुळे बाराही महिने खेळाडूंना सराव करण्यासह स्पर्धा खेळता येणार आहेत त्याचबरोबर १०० खोल्यांचे वसतिगृह उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी रत्नागिरीत आलेले खेळाडू, शिक्षक यांच्या निवासाचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटणार आहे. रत्नागिरीतील एमआयडीसीमध्ये सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे जिल्हा क्रीडासंकुल उभारण्याचे काम अपुऱ्या निधीमुळे अडकून पडलेले होते. पंधरा वर्षांपूर्वी आघाडीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कालावधीत संकुलाचे भूमीपूजन झाले होते. त्यानंतर बराच काळ निधीची तरतूद न झाल्यामुळे काम रखडले; परंतु उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा क्रीडासंकुलासाठी मागील वर्षी पाठपुरावा केला.
क्रीडामंत्र्यांकडे झालेल्या बैठकांमुळे २९ कोटीची तरतूद करण्यात आली. त्यामधून सर्व सोयीसुविधांयुक्त जिल्हा क्रीडासंकूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एमआयडीसी येथे ११.५० एकर जागेत हे संकूल उभारण्यात येत आहे. जिल्हा संकुलासाठी २९ कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातील ७ कोटी रुपये मारुती मंदिर येथील संकुलावर खर्ची करण्यात आला. उर्वरित २३ कोटीमधून एमआयडीसी येथे संकूल उभारले जाणार आहे. त्यामध्ये ३.५० कोटी रुपये विविध खेळांसाठी इनडोअर मैदान उभारले जाणार आहे. ते ५७ बाय ३२ मीटरचे आहे. तसेच त्या ठिकाणी ४०० मीटरचा सिंथेटिक धावन मार्ग बांधला जाणार असून, त्यावर ८ ते १० कोटी रुपये खर्ची टाकण्यात येणार आहेत तसेच मुला-मुलींना राहण्यासाठी ५०० बेडचे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.