रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत असताना आता पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले आहे. किरण सावंत हे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नारायण नाणे यांनी किरण सामंत यांना आशीर्वाद दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा महायुतीकडून किरण सामंत यांचे नाव आता चर्चेत आलं आहे.
याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये किरण सामंत हे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत फायनल होणार का? अशी चर्चा यामुळे रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे लवकरच पडघम वाजू लागतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवणारच या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
कारण यावेळी किंगमेकरची भूमिका बाजूला ठेवून किरण सामंत हे लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी नियोजन बद्ध प्रचार ही सुरु केला आहे. दरम्यान नारायण राणे यांची नुकतीच किरण सामंत यांनी भेट घेऊन पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत. राणे कुटुंबीय यांनीही किरण सामंतांना आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आता किरण सामंतांचा मार्ग सुखकर झाल्याचा बोललं जात आहे.