वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर वाचा फुटली आहे. सख्ख्या दिराच्या मुलानेच त्या वारकरी महिलेचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे, याप्रकरणी वर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी देखील पोलिसांनी सुरू केली आहे. प्रकाश हरचिरकर (५०) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. शुक्रवारी चिपळूणमध्ये एक अघटित घटना घडली. लक्ष्मी हरचिरकर या ७० वर्षीय महिलेला वालोपे येथील शेतात फरफटत नेत ठार मारण्यात आले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.
या प्रकरणाने संपूर्ण चिपळूण हादरून गेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकरणाने चिपळूण पोलिसांना देखील धक्का बसला. लक्ष्मी हिच्या मुलानेच या खुनाबाबत स्पष्ट शब्दात संशय व्यक्त करत पोलिसांच्या तपासाला दिशा देण्याचे काम केले होते. त्यामुळे पोलिसांनी देखील वेळ न घालवता पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करून पुढील तपास सुरू केला होता. मुळात हरचिरकर कुटुंबात जमिनीच्या वादातून गेले काही वर्षे वाद सुरू होते. त्यावरून अनेकवेळा भांडणतंटे झाले होते. लक्ष्म ीच्या दिराच्या मुलगा प्रकाश हा सतत राग धरून असायचा. ती देवदेवस्की करते असा संशय त्याला होता. घरात मात्र जमिनीचे निमित्त धरून त्यावरून देवदेवस्कीचा विषय समोर येत होता, असे महिलेच्या मुलाचे म्हणणे आहे.
त्याने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी देखील त्याअनुषंगाने तपास सुरू करून सर्वप्रथम प्रकाश हरचिरकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु प्रकाश सद्या पसार आहे. परंतु प्रकाशच्या कुटूंबियांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. शनिवारी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांचे जाबजाबाब घेतल्यानंतर घरी पाठवण्यात आले. मात्र गरज लागल्यास पुन्हा यावे लागेल असेही पोलिसांनी बजावले आहे. प्रकाश यानेच लक्ष्मीचा खून केला हे आता पोलीस तपासात पुढे आले असल्याने पोलिसांनी थेट प्रकाश हरचिरकर यांच्याकडे लक्ष केंद्रित केले असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.