रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहोचला असतानाच रत्नागिरीत एक वेगळीच घडामोड पहायला मिळाली. या मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असणारे उद्योजक किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे बॅनर हटविल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याचे व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत असल्याने नव्या चर्चांना पेव फुटले आहे.
दुसरीकडे राजकीय वर्तुळात किरण सामंतांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केल्याची. चर्चा सुरू झाल्याने नेमके राजकारण तरी काय? असा सवाल पडला आहे. उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले.
किरण सामंत संपर्क कार्यालय – किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरी शहरातील प्रसार माध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर ते महायुतीच्या प्रचारसभेत दिसल्याने वाद निवळल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी ‘मन की बात’ अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत सोशल मीडियावर मिळत आहेत.
तिकिट न मिळाल्याने नाराज? – किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांचे कार्यकर्तेही यामुळे नाराज होते. मात्र आपण पक्षासाठी काम करणार असं किरण सामंत यांनी सांगितलं होतं. पण, आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बॅनर प्रकरणामुळे किरण सामंत यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.
भावाचे बॅनर हटविले? – नेमकं काय राजकारण सुरू आहे? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून भावाचे बॅनर का हटविले जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उदय सामंत यांचे बॅनर हटविले जात असताना नेहमी गजबजलेल्या किरण सामंत यांच्या कार्यालयात मात्र शुकशुकाट पहायला मिळत आहे.
स्वतंत्र वाटचालीचे संकेत? – दरम्यान, अचानक उदय सामंत यांचा बॅनर हटवून ‘किरण सामंत संपर्क कार्यालय’ असा बॅनर लावण्यात आल्याने किरण सामंत आता स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू करणार की काय? असाही सवाल सोशल मीडियावर अनेकांनी उपस्थित केला आहे.

 
                                    