कोकण हा शेतीप्रधान विभाग. विविध प्रकारच्या धान्याची, भाजीपाल्याची, फळांचे उत्पादन कोकणामध्ये घेतले जाते. कोकणची माती जात्याच सुपीक असल्याने विविध प्रकारच्या उत्पादन निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याचप्रमाणे आताचा शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध प्रकारचे उपक्रम राबवून वेगवेगळी उत्पादने घेत असतो.
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा परिषद कृषी विभाग रत्नागिरी आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत “खरीप हंगामातील पिक लागवड” या ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शेतकर्यांना शेती संदर्भातील अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले आहे. कोकण कृषी विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या विविध भातांच्या सुधारित जातींचा वापर आणि विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान यांची सांगड घालून कोकणातील भात पिकाची उत्पादकता वाढविणे सहज शक्य असल्याचे मत कुलगुरू डॉ.सावंत यांनी व्यक्त केले.
चालू वर्ष हे विद्यापीठाचे महोत्सवी वर्ष असून, कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत वेबिनार मालिका सुरु करण्यात आली असून, प्रथम वेबिनार हा भात लागवडीच्या विविध पद्धती, रोप प्रक्रिया, पुनर्लावणी या विषयांवरील सखोल माहिती कृषी विद्या विभाग, विभाग प्रमुख डॉ.बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. वेबिनार मालिकेचे प्रास्ताविक अजय शेंडे आणि सूत्रसंचालन डॉ.वरवडेकर यांनी केले.
या ऑनलाईन परिसंवादाला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, जिल्हा परिषद सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने इत्यादी अधिकारी आणि कर्मचारी, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.