कोकणाला नैसर्गिकत: विविध फळे, फुले मासे, पिके यांचे भरभरून सुख मिळाले आहे. त्यामुळे याच निसर्गाच्या देणगी पासून विविध उत्पादने तयार केली जातात. आपण रेल्वे किंवा विमानामध्ये चहा अथवा कॉफीसाठी डीप करण्यासाठी छोट्या बॅग पाहतो,तशाच प्रकारच्या डीप बॅग दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी कोकम सरबताच्या बनवल्या आहेत. केवळ उन्हाळ्यामध्येच नव्हे तर इतरही हंगामात कोकम सरबत पै-पाहुण्यांसाठी कायमच सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असते.
कोकण कृषी विद्यापिठाच्या प्राध्यापकांनी कोकम सरबत डीप बॅग बनवली आहे. व्यापारीदृष्ट्या लवकरच या बॅग उत्तम सॅचेटमधून बाजारात येणार आहेत. याबाबतचे पेटंट कृषि विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. कोकम सरबत डीप बॅग बनविण्याचे हे तंत्र ज्यांना हवे असेल त्यांना ते देण्यास विद्यापीठ तयार आहे. डीप टीप्रमाणे कोकम सरबताची ही बॅग पाण्यात बुडवायची आणि त्यात साखर टाकली की उत्तम दर्जाचे कोकम सरबत तयार होते. गुणवत्तेच्या सर्व निकषांना हे खरे उतरले आहे.
कोकण कृषी विद्यापीठात नुकताच सुवर्णपालवी महोत्सव झाला. त्यावेळी या कोकम सरबत डीप बॅगचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था रोहा (जि. रायगड) येथील प्रा. व प्रमुख डॉ. प्रदीप रेळेकर व त्यांच्या सहकार्यांनी कोकम सरबत डीप बॅग तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले. याचे पेटंट कोकण कृषी विद्यापीठाचे पहिलेच पेटंट आहे. या संशोधन कार्यात डॉ. रेळेकर यांना ललित खापरे व प्रशांत देबाजे, डॉ. केशव पुजारी यांनी सहकार्य केले. २०१७ पासून पाच वर्षे पेटंट मिळविण्यात गेली. त्यासाठीच्या सर्व निकषांस या बॅग पात्र ठरल्या आहेत.