कोकणामध्ये शिमगा जोशात साजरा करण्यात आला. प्रत्येक गावागावामध्ये वेगवेगळ्या चाली, रूढी, परंपरा, पालखी नाचवण्याच्या विविध पद्धती, प्रत्येक शिमगोत्सवाच्या विविध प्रथा पाहायला मिळतात. चिपळूण मधील करंजेश्वरीचा शेरणे शोधण्याची प्रथा असेल अथवा शिमगोत्सवानंतर खुणा घालण्याची प्रथा रूढ आहे, विविध ठिकाणची नावे मात्र वेगवेगळी असतात.
ग्रामदेवतेप्रती श्रध्दा दृढ करणारी ही प्रथा अनेक गावांत सुरू आहे. खुणेच्या या परंपरेविषयी काही रंजक कथाही ग्रामीण भागात सांगितल्या जातात. त्यामुळे खुणेविषयी सर्वांनाच कुतुहल आणि उत्सुकता असते. ही खुणेची प्रथा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. शिळ येथे श्री ब्राह्मणदेवाच्या शिमगोत्सवानंतर खुणा घालण्याची प्रथा आहे. शिमगोत्सवात देवाचे कार्य पार पडून शिंपणे पडले की दुसर्या दिवशी ही खुणा घालण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे रविवारी हा खुणा शोधण्याचा कार्यक्रम होणार आहे.
विशिष्ट ठिकाणी लपविण्यात आलेली खुणा ग्रामदेवतेची पालखी शोधून काढते. शहरानजीकच्या शिळ येथे रविवार २७ मार्च रोजी श्री ब्राह्मणदेवाची पालखी खुणा शोधणार आहे. सतीचा मळा येथे सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम होणार असून ही अनोखी प्रथा अनुभवता येणार आहे. शिमगोत्सवात देवाचे कार्य कोणतीही चूक न होता निर्विघ्नपणे पार पडले की नाही याची खुद्द ग्रामदेवतेकडूनच जाणून घेण्यासाठी खुणा घालण्याची प्रथा प्रचलित आहे.
खुणेच्या आदल्या रात्री ग्रामदेवतेचे मानकरी मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्या ठिकाणी खड्डा खोदून त्यात नारळ आणि फुलं मातीत लपवितात. दुसर्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी त्या ठिकाणी आणून ढोल-ताशांच्या गजरात नाचविली जाते. यावेळी खुणा ठेवणारे मानकरी खुणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवितात त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खुणा बिनचूक शोधून काढते.