राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते शिवसेनेवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. तुम्हाला सत्ता पाहिजे ना. मी सगळ्यांसमोर सांगतो. मी येतो तुमच्यासोबत, पण तुम्ही जे चाळे केले आहेत. कुटुंबीयांची बदनामी करता ना; आम्ही तुमच्या कुटुंबीयांची बदनामी केली का? तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय गोष्ट आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढाच तुमचा जीव जळत असले तर मला टाका तुरुंगात, मर्द असाल तर मर्दासारखे लढा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात निवेदन सादर करत विरोधी पक्षांच्या आक्षेपांना जशास तसे उत्तर दिली. आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत मग पहाटेच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते, नाही का?
मर्द असाल तर या मर्दासारखा अंगावर येऊन लढा, सत्तेचा दुरुपयोग करून समोर येतात. शीखंडीला लढण्याची ताकद नव्हती, त्याला मध्ये टाकलं. आता शीखंडी कोण आणि मर्द कोण आहे, हेच कळण कठीण झाले आहे. कोण कुणाच्या मागून लढत आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या, नामर्दासारखे लढू नका. यंत्रणा वापरायच्या कुटुंबीयांना बदनाम करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. अशी कारस्थाने करण्यापेक्षा काही सूचना असतील तर सांगा, कोण गुन्हेगार असेल तर सांगा आम्ही नक्कीच कारवाई करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.