बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधी पक्षाच्या हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ झाली आहे. जामिनासाठी त्यांना आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही राणे अज्ञातवासात आहेत. ते नेमके कोठे आहेत? त्यांच्या ठावठिकाणा काय ? याची अजूनही कोणालाच काहीच खबर लागली नसून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मुंबई मधील विविध भागांमध्ये राणे कुटुंबीयांना डिवचणारे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचा दावा करण्यात आला आहे. नितेश राणे हे हरवले असून, त्यांना शोधून देणाऱ्याला बक्षीस म्हणून एक कोंबडी देण्यात येईल असे देखील या बॅनरवर लिहण्यात आले आहे. या बॅनरमुळे आता नविन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पोस्टर नेमके कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र भाजप आमदार नितेश राणे यांची ओळख दर्शवणारी माहिती देखील या बॅनरवर लिहण्यात आली आहे. या माहितीमध्ये दिलेली नितेश राणे यांची ओळख म्हणजे नक्कीच खोचक ठरणारी आहे. या बॅनरमुळे आता कोकणातील शिवसेना विरुद्ध राणे ही धुसपूस आता मुंबईमध्येही बॅनर वॉरच्या माध्यमातून पहायला मिळत आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडीचे बक्षीस लावण्यात आले असल्याचेही लिहण्यात आले आहे. नितेश राणे कुठे गायब झालेत याबद्दल मात्र अजून काहीच कल्पना नसल्याने पोलीस हर तऱ्हेने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.