पावसाळ्यात भूस्खलनाच्या खुणा कायम कोळकेवाडी आठ वर्षे विकासकामाविना

167
Kolkewadi has been without development for eight years, with traces of landslides in monsoons

कोयना टप्पा चार आणि दोनमधील पुनर्वसित कोळकेवाडी गाव आजही विकासापासून दुर्लक्षित राहिले आहे. गेल्या आठ वर्षांत या गावात पुनर्वसन निधीतून एकही विकासकाम झालेले नाही. २२ जुलैच्या अतिवृष्टीत गावात घरांना गेलेल्या भेगा, भूस्खलनाच्या भयप्रद खुणा आजही ताज्या आहेत. गावातील पाचही स्मशानशेड मोडले आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून विकासकामांचे अंदाजपत्रक बनवले; पण त्यापुढे हालचाली झालेल्या नाहीत. पुनर्वसन झालेल्या या गावांकडे शासन लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल केला जाऊ लागला आहे. कोळकेवाडी गावची लोकसंख्या सुमारे चार हजार. तेथील कोयना प्रकल्प तीन आणि चारच्या धरणामुळे पुनर्वसित गाव आहे. या प्रकल्पासाठी गावातील ८०० एकरहून अधिक जमीन संपादित झाली आहे. गाव पुनर्बाधित म्हणून २०१५ पुनर्वसन योजनेतून कामे व्हायची; मात्र गेल्या आठ वर्षात गावात एकही विकासकाम झालेले नसल्याचे तेथील माजी सरपंच नीलेश कदम यांच्यासह ग्रामस्थ सांगतात. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांची दरवाजे केव्हाच बंद झाली आहेत. परिणामी, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधीचा महसूल ज्या प्रकल्पातून सरकारला मिळतो, त्या प्रकल्पासाठी जमिनी देणारे प्रकल्पग्रस्त मात्र सध्या बेदखल झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

२२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीत या गावात डोंगरात भूस्खलन झाले. जमिनींना भेगा गेल्या, घरांचीही पडझड झाली. हसरेवाडी, बोलादवाडी, तांबडवाडी, बौद्धवाडी येथील घरांना त्याची झळ बसली. यावर कुठेही सरंक्षक भिंती उभारलेल्या नाहीत अथवा उपाययोजना केलेल्या नाहीत. त्या वेळी तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तत्कालीन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही गावचा विकास आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता; मात्र गेल्या दोन वर्षात त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.अतिवृष्टीत गावातील पाचही स्मशानशेडवरील पत्रे उडून गेले. सध्या या स्मशानशेड अखेरच्या घटका मोजत आहेत. स्मशानशेडचे सांगाडे उभे आहेत; मात्र तेथील निवाराशेड आजतागायत उभ्या राहिलेल्या नाहीत.गावात दिवाबत्तीसह नागरी सुविधांची वानवाच आहे. कोळकेवाडीतून ग्रॅव्हिटीच्या योजना परिसरातील गावांना केल्या आहेत; मात्र त्या करताना गावातून मनमानी पद्धतीने योजनांच्या पाइपलाइनसाठी खोदाई करण्यात आली.परिसरातील गावांना पाणी नेण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केलेला नाही; मात्र जमिनीची केलेली नासधूस योग्य आहे का? प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष का करते, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.