25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriकोकण रेल्वेने फुकट्यांकडून अडीच कोटींचा दंड केला वसूल

कोकण रेल्वेने फुकट्यांकडून अडीच कोटींचा दंड केला वसूल

प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मुंबईकर चाकरमानी कोकणाकडे वळू लागले. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल महिन्यापासून प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये काही तिकीट नसलेले प्रवासीही आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहिम हाती घेतली आहे. एप्रिल महिन्यात १५ हजार १२९ फुकट्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक दंड आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर एसटीसह खासगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा लोकांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होते. गणपती, दिवाळी, ख्रिसमस या सणांसह उन्हाळी सुट्टीत चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावाकडे येतात. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे मार्च, एप्रिल या दोन महिन्यात चाकरमान्यांच्या कोकणातील फेऱ्या वाढल्या होत्या. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर मोठ्याप्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामध्ये काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोकण रेल्वेच्या विशेष पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे.

मागील सहा महिन्यात कोकण रेल्वेकडून दंडात्मक कारवाईचा दणका फुकट्या प्रवाशांना दिला आहे. एप्रिल २०२४ या एका महिन्यात १५ हजार १२९ अनधिकृत, अनियमित प्रवासी तिकीट नसलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तत्पूर्वी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या तीन महिन्यात १४ हजार १५० विनातिकीट प्रवासी आढळून आले होते. त्यांच्याकडून ८६ लाख ६७हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ऑगस्ट २०२३ मध्ये ४ हजार ४८४ विनातिकीट प्रवाशांकडून २६ लाख ६७हजार ५५५ रुपये, सप्टेंबर २०२३ मध्ये ४ हजार ८८८ विनातिकीट प्रवाशांकडून २७ लाख ०९ हजार ७०० रुपये, तर ऑक्टोबर २०२३ मध्ये ४ हजार ७७८ विनातिकीट प्रवाशांकडून ३२ लाख ६० हजार ५६५रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. ही कारवाई सातत्याने केली जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील महिन्यातही चालू राहणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular