पंतप्रधान सिंचन योजनेतंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन देखील पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेली दोन वर्षे रखडलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अधीक्षक अभियंता यांनी या कामांकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अर्जुना प्रकल्प हा जिल्ह्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून, या धरणात पाण्याचा साठा देखील मुबलक प्रमाणात आहे.
मात्र, कालव्याची कामे पूर्ण नसल्याने परिसरातील शेतकरी धरणाच्या पाण्यापासून आजही वंचित आहेत. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून कालव्याच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वीच निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे डाव्या व उजव्या कालव्याची कामे रखडलेली आहेत. मागील वर्षी प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती ‘जैसे थे’ ठेवण्यात आली असून, शेतकऱ्यांना शेती करता न आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सांगून देखील त्यांनी याची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकही पैसा मोबदला म्हणून दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. या कालव्याचे डाव्या-उजव्या अशा दोन्ही बाजूंनी काम सुरू आहे. नियोजित मार्गातून पाईपलाईन टाकण्यासाठी जमीन खोदकाम सुरू आहे. मागील वर्षी पाईपलाईन टाकताना खोदण्यात आलेली माती तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. खोदकाम करताना सापडलेले मोठे दगड न उचलता ते शेतकऱ्यांच्या शेतातच ठेवले आहेत.
खोदलेली चर व्यवस्थित न भरल्याने त्यातून वाहून गेलेली माती शेतात पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी खोदकाम करताना शेतकऱ्यांच्या बागायती व कुंपणांचेही नुकसान झाले आहे. आंबा-काजू बागायतींची मागणी करूनही अद्याप मूल्यांकन करण्यात आलेले नाही. मूल्यांकनच झाले नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.