लोटे एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी थेट जवळच्या खाडीत सोडण्याचा प्रकार थांबला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कोतवली ग्रामस्थांनी दिला. लोटे एमआयडीसीच्या औद्योगिक भवनात आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांपुढे ही भूमिका मांडली तसेच लोकांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू करा, असेही ठणकावले. कोतवली येथे एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्याने प्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक तसेच जनावरांचेही आरोग्यही धोक्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कुलकर्णी, एमआयडीसीचे अधिकारी हळदणकर, सीईटीपीचे भूषण शिंदे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. कोतवलीच्या सरपंच अक्षता तांबे, सदस्य मंगेश तांबे, संगीता धापसे, सुनीलभाऊ सावर्डेकर, जाफर परकर, केतन पेवेकर, रूपेश पेवेकर, अंकुश पेवेकर, रूपेश जुवळे, नरेश जाधव, सचिन तांबे, राजेंद्र तांबे, प्रथमेश धापसे, प्रल्हाद धापसे, सुनील जाधव, सत्यवान जुवळे, सचिन जुवळे, वसंत जुवळे, रूपेश जुवळे, विनोद आंब्रे आदी ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. कोतवली गावाला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा आणि गेल्या २०-२५ वर्षांपासून दूषित पाण्यामुळे शेती व फळबागांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी केली. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या, विद्यार्थ्यांना उद्योगांकडून शैक्षणिक दत्तक योजना राबवावी तसेच परप्रांतियांऐवजी स्थानिकांना रोजगार द्यावा, अशा मागण्याही या वेळी केल्या. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले तसेच येत्या पंधरा दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक घेऊन सर्व समस्यांवर ठोस निर्णय घेऊ, असेही सांगितले. तेव्हा ग्रामस्थांनी आश्वासनं नको, कृती हवी असे सांगितले तसेच मागण्यांची पूर्तता झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही दिला.
ग्रामस्थांमध्ये मतभेद – एमआयडीसीत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांमधील मतभेद पुढे आले. काही ग्रामस्थ या बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीच्या नियोजनाची कल्पना नव्हती आणि ज्या मागण्या मांडल्या त्याचीही ग्रामपंचायतीला कल्पना नसल्याचे बाहेर पडलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.

 
                                    