26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeChiplunकोयनेचे '२ टप्पे' होणार तात्पुरते बंद

कोयनेचे ‘२ टप्पे’ होणार तात्पुरते बंद

राज्याच्या वीजनिर्मिती क्षमतेत ५०० मेगावॉटची घट होणार आहे.

कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम महिन्याभरात सुरू होणार आहे. यासाठी १९ नोव्हेंबरपासून कोयनेच्या टप्पा १, २ ची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या वीजनिर्मिती क्षमतेत ५०० मेगावॉटची घट होणार आहे. पोफळी परिसरातील ४ गावांचा पाणीपुरवठाही दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. गेली पाच वर्षे ही गळती सुरू आहे. त्यामुळे दिवसा हजारो लिटर पाणी वाया जाते.

कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाबाने बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० मध्ये बांधून पूर्ण झाली आहे. डोंगरातील कातळ फोडून ही विहीर बांधलेली असून, ती कातळात १०० मीटर खोल खोदलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रूंदीचे काँक्रिटचे अस्तरीकरण केलेले आहे. साठ वर्षे या भिंतीने भूकंपाचे अनेक धक्के पचवलेले आहेत. आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्हटनेल किंवा आपत्कालीन झडपेद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते.

ही गळती काढण्यासाठी सुमारे २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्जवेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सोपे नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लाणार आहे आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे. या सर्व कारणांमुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळलेले होते. गळती काढणे आणि त्या वेळी वीजनिर्मिती बंद ठेवणे यासाठी ऊर्जा आणि जलसंपदा खात्याची मंजुरी आवश्यक होती. हे दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. मंजुरीनंतर गळती काढण्याच्या कामाला वेग आला आहे. १९ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद करून गळती काढण्याच्या कामाची प्राथमिक तयारी सुरू केली जाणार आहे.

पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागणार – पोफळी येथील ईव्हीटीच्या पाण्यावर पोफळीसह कोंडफणसवणे, शिरगाव, मुंढे गावच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. टप्पा एक आणि दोनमधील वीजनिर्मिती बंद झाल्यानंतर या गावच्या पाणीयोजना बंद होणार आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांसाठी या गावांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular